निज रे निज तान्ह्या
588.
निज रे निज तान्ह्या बाळा ।
निज रे जीवींच्या जिव्हाळा ।
निज रे निज कान्हा वेल्हाळा ।
निज रे निज त्रैलोक्यपाळा॥धृ॥
करी धरूनी दोरू ।
देती स्नेह-झोलू ।
हलवी हळूहळू ।
यशोदा वेल्हाळा ॥१॥
जो जो जो जो मरी त्याते ।
“हा हा हा हा आला येथे ।
जोगी”, सांगे बालकाते ।
यशोदा वेल्हाळा ॥२॥
निजासी ‘ नीज’ म्हणे ।
कोण ते स्वरूप नेणे ।
मायेच्या भुललेपणे ।
निजवी गोपाळा ॥३॥
हळूहळू पै कर मुखे ।
हलवी तेणे सुखे ।
रूदना करी तो देखे ।
गोविंद सावळा ॥४॥
म्हणे माता, “अवधारी ।
जोगी आला बाहेरी ।
त्रिशूळ डमरू करी ।
दिसतो विशाळा ॥५॥
विभूतीचे विलेपन ।
मस्तकी जटा जाण ।
मेधा तिसरा नयन ।
पाहे गोपाळा ॥६॥
रूंड माळा गळा ।
व्याघ्रांबर मेखळा ।
मस्तकी झुळझुळा ।
वाहतसे बाळा ॥७॥
कपाळी अर्धचंद्र ।
कानी मुद्रा सुंदर ।
न कळे तयाचा पार ।
ब्रह्मादिकाला” ॥८॥
इतुके ऐकोनी कानी ।
बाळ बैसे उठोनी ।
म्हणे “माते नयनी ।
दाखवी त्याला” ॥९॥
काळाचा जो काळ ।
व्यापक त्रैलोक्यपाळ ।
जोग्याचे दावोनी खुळ ।
नवल गोपाळा ॥१०॥
बहिणी गाई चक्रपाणी ।
करूनी नाटकवाणी ।
रामकृष्ण स्मरणी ।
घेती सोहळा ॥११॥
