बैसोनि निवांत करीन च
259.
बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा ॥१॥
नामाचा आठव हेचि सोपे वर्म । अवघे कर्माकर्म पारूषती ॥२॥
या परते साधन आन कांही नेणे । अखंड वाचे म्हणे रामकृष्ण ॥३॥
सुलभ हा मंत्र तारक जीवासी । येणे भवासी उतार होय ॥४॥
चोखा म्हणे मज सांगितले कानी । राम कृष्णा वाणी जप सदा ॥५॥
