वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › १०. पुष्पक विमान प्राप्ती

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088321 · अभंग क्र. १०

10.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय दहावा ॥
रावणाला ब्रह्मदेवाचे वरदान

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांचा प्रश्न :

तदनंतरे अयोध्यापती । ऐकोनि रावणकुंभकर्ण उत्पत्ती ।
अत्यंत सुखावोनि चित्ती । मुनीप्रती पुसता झाला ॥१॥
ऐके स्वामी अगस्तिमुनी । तुवा समुद्र प्राशिला आचमनीं ।
दंडकारण्य वसे तुझेनी । विंध्याद्रि धरणी निजविला ॥२॥
वातापी इल्वल महाराक्षस । मारोनि ऋषी केले ससंतोष ।
ऐसे तुझे उपकार बहुवस । तू महापुरूष ईश्वरु ॥३॥
कृपा करोनि मज दीनावरी । कथा सांगावी पुढारीं ।
गोकर्णाश्रमीं रावण घटश्रोत्री । काय करिते पै झाले ॥४॥
कोण तप तयांचे फळले । काय नेम करिते झाले ।
कोण व्रत आचरले । कैसेनि पावले ऐश्वर्या ॥५॥
आधींच कथा रामायण । त्यावरी तुमच्या मुखें निरुपण ।
आजि शवणाचे भाग्य गहन । धणीवरी पान करीन मी ॥६॥
विबुधजितजनकारीचे वचन । ऐकोनि अगस्ती संतोषोन ।
वाक्पुष्पमाळा गुंफोन । रामार्पण करिता झाला ॥७॥

रामप्राप्तीसाठी साधना करणार्‍यांचे प्रकार :

श्रीराघवा तू अवधारी । जयालागीं गिरिकंदरी |
वसते झाले जटाशिरी । फळाहारी होवोनियां ॥८॥
एक झाले बोडके । ढुंगी लावोनि फडकें ।
तीर्थे हिंडती अनेके । भिक्षान्नें खावोनियां ॥९॥
एक मुखी लाविनि कोळसा । वेष घेती अनारिसा ।
एक नग्न पिशाचदशा । हिंडती पुरी पाटणीं ॥१०॥
एकी आश्रम त्यागोन । सेविलेंसे महावन ।
एक पंचाग्नि धूम्रपान । जळशयन एक करिती ॥११॥
एक कान फाडोनि मुद्रा ल्याले । आलेख म्हणोनि हिंडो लागले ।
लक्ष नेणती चुकले । भिके लाविले प्रारब्धें ॥१२॥
एक मस्तक लुंचिती । चालता क्षिती झाडिती ।
झाडावरी बैसोनि देहकर्म करिती । देहातें देव म्हणोनी ॥१३॥
ऐसी अनेक मतांतरें । धुंडाळिते झाले नर ।
परंतु न कळेचि तुझा पार । न पावती ते कदाकाळें ॥१४॥
तरी अवधारी राजेंद्रा । इंद्राच्या आदिइंद्रा ।
क्षयो आहे इंद्राचंद्रा । तू नरेंद्रा अक्षयी ॥१५॥
तो तू धरणिजेचा पती । अवतरलासि नानाव्यक्ती ।
ऐसा तू आम्हा मुढाप्रतीं । नाना कथा पुसतोसि ॥१६॥
तिघे बंधु गोकर्णाप्रती । येवोनि काय करिते झाले स्थिती ।
ते कथा अवधारिजे श्रोती । सावधान चित्ती होवोनी ॥१७॥

कुंभकर्णाची घोर तपश्चर्या :

कुंभकर्ण नित्य नेमस्त । अल्पआहार एकाग्रचित्त ।
इंद्रियां दमूनि वैराग्ययुक्त । परियेसा तप करीतसे ॥१८॥
उष्णकाळी पंचाग्नि जाण । वर्षाकाळीं मस्तकी घे पर्जन्य ।
शीतकाळी जळआश्रय । तप दारुण करीतसे ॥१९॥
बाणांवरी घालोनि आसन । तप करीतसे दारुण ।
ऐसी दहा सहस्त्र वर्षे क्रमण । केलीं जाण श्रीरामा ॥२०॥

बिभीषणाची उत्कट तपस्या :

स्वधर्मकर्मीं रत । सर्व भूतीं दया शुचिष्मंत ।
ऐसा बिभीषण पुण्य पवित्र । धर्मपरायण परोपकारी ॥२१॥
परोपकाराएवढें तप । नाही श्रीरामा निश्चित ।
जे परावियातें पीडा करित । पाप अद्भुत अंत नाही ॥२२॥
ऐसा बिभीषण पुण्यमूर्ती । पाच सहस्त्र वर्षे तपःस्थिती ।
एका पायावरी निगुतीं । श्रीरघुपति क्रमियेलें ॥२३॥
तप देखोनि दारुण । स्वर्गी देवा भयाचें भान ।
तेथे अप्सरा येवोन । नृत्य करित्या पै झाल्या ॥२४॥
बिभीषणाची तपःस्थिती । देखोनि देव पुष्पे वर्षती ।
तदनंतरे सूर्य उपस्थिती । करी सुमति राक्षस ॥२५॥
उर्ध्वशिर ऊर्ध्वकर । नयन ऊर्ध्व अवलोकी भास्कर ।
मुखें सूर्यसुक्त जपे वीर । ऐसी पांच सहस्त्र वर्षे क्रमलीं ॥२६॥
एवं दहा सहस्त्रवरी । बिभीषणतपाची अगाध थोरी ।
तदनंतरे श्रीरामा तुझा वैरी । त्याच्या थोरी तू ऐके ॥२७॥

रावणाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव प्रगटला :

दहा सहस्त्र वर्षेंपर्यंत । निराहारी तप करित ।
एक सहस्त्र वर्षें होता तेथ । अग्नींत होमित शिर एक ॥२८॥
ऐसी नव सहस्त्र वर्षे क्रमिली । नव शिरें अग्नींत हविलिं ।
एक शिर उरले मौळीं । दहावें सहस्त्र पवर्तले ॥२९॥
तेंही शिर छेदीन । वैश्वानर तृप्त करीन ।
ऐसे वैवंची रावण । तंव चतुरानन तेथे आला ॥३०॥
इंद्रादि देवांसहित । पितामह आला तेथ ।
म्हणे रावणा तुझे तप अद् भुत । मज संतोष पै झाला ॥३१॥
तुझिया तपाची थोरी । न वर्णवे वाचेकरीं ।
तुज प्रसन्न झालों झडकरी । माग इच्छा ते देईन ॥३२॥
पितामहाचें ऐकोनि वचन । दोह्नी कर जोडोनि रावण ।
करिता झाला साष्टांग नमन । मधुर वचन बोलिला ॥३३॥

भगवन्प्राणिनां नित्यं नान्यत्र मरणाद्भयम् ।
नास्ति मृत्युसमः शत्रुरमरत्वमहं वृणे ॥१॥
सुपर्णयक्षनागानां दैत्यदानवरक्षाम् ।
अवधोऽहं प्रजाध्यक्षो देवतानां च शाश्वतम् ॥२॥
तृणभूता हि ते मन्ये प्राणिनो मानुषादयः ॥३॥

रावणाची अमरत्वाची मागणी :

रावण म्हणे गा प्रजापती । तुम्हांप्रति करितो विनंती ।
मरणभयाहूनि निश्चिती । प्राणिया भय असेना ॥३४॥
मृत्युसारिखा दुसरा वैरी । आन नाही ये संसारी ।
मृत्यु प्राणियां संहारी । मृत्युनें केले देवाचे न चले ॥३५॥
बाल्य तारुण्य वयसा । मृत्यु करी आयुष्य-हासा ।
जनातें बांधी मरणफांसा । मृत्युचा सहसा न कळे महिमा ॥३६॥
जरी प्रसन्न झलेति देवा । अमरत्व मज वर द्यावा ।
सुपर्ण नाग दैत्य दानवा । यांचेनि मृत्यु मज न हो ॥३७॥
निशाचरांचेनि हातें । मज मरण न यावे निश्चिते ।
आणिके देवदैवतें । तींही माते न मारोत जी ॥३८॥
देवांचेनि हातेंकरीं । माझा मृत्यु न व्हाव अवधारी ।
मनुष्य म्हज तृणासरी । गणना न करी तयांची ॥३९॥
मानवे तृणासमान । ती माझे दृष्टीसी मधकें दीन ।
तयांचें भय नाही जाण । अमर आपण मज कीजे ॥४०॥
मनुष्यादिकरोनि भूते । नाणी मी दृष्टीस त्याते ।
त्या मनुष्यांची चिंता नाही माते । जाण निश्चिते प्रजापति ॥४१॥
जरी प्रसन्न झालासी मजवरी । अमर होई ऐसी कृपा करी ।
ब्रह्मा म्हणे होईल निर्धारी । चिंतिलें पावशील रावणा ॥४२॥

ब्रह्मदेवाने रावणाला अमरत्व देऊन त्याची सर्व शिरे त्याला दिली :

इतुकियांचें हातें तत्वता । मरण तुज नव्हे लंकानाथा ।
सत्य मानी मम वाक्यार्था । अमर तत्वता तुज केले ॥४३॥
अगस्ति म्हणे श्रीरघुनाथ । प्रजापतीनें विंदाण करुनि तत्वता ।
वर दिधला लंकानाथा । भविष्यता जाणोनि ॥४४॥
पुनरपि बोले प्रजापती । ऐक ये गा लंकापती ।
तुवा शिरे हविलिं अग्नीप्रती । ती मागुतीं तुज दिधली ॥४५॥
पूर्विल्यापरी राक्षसास । सुंदरता बाणली बहुवस ।
तदनंतर बिभीषणास । बोलता झाला चतुरानन ॥४६॥
बिभीषणा तू धन्य सुमती । बिभीषणा तुझी अगाध कीर्ती ।
बिभीषणा तुझी शुद्ध तपःस्थिती । अत्यंत चित्ती सुखावलों ॥४७॥
बिभीषण तुझे निष्काम तप । बिभीषणा तुझा धन्य जप ।
बिभीषणा तू निर्विकल्प । सुख अमूप मज झाले ॥४८॥

बिभीषणाला वरप्रदानाची इच्छा :

जो वर मागसी ये समयी । तो मी देईन जाण निश्चयीं ।
बिभीषणें मस्तक ठेविला पायी । काय ते समयी बोलत ॥४९॥
सकळ गुणीं संपन्न । ऐसा बिभीषण धर्मज्ञ ।
मृदु मंजुळ वाचेकरुन । चतुरानन प्रार्थिला ॥५०॥
प्रजाध्यक्ष प्रजापती । सकळ देव तुज आश्रयिती ।
परी एक माझी विनंती । सावित्रीपति ऐकिजे ॥५१॥
आजि आपण धन्य धन्य । आजि फळले सकळ पुण्य ।
जो त्रैलोक्यगुरू चतुरानन । स्वये आपण वर देतो ॥५२॥
संतोषोनि प्रजापती । जरी वर देतोसि मजप्रती ।
तरी मागणें सुनिश्चितीं । समाधानवृत्ती अवधारी ॥५३॥

बिभीषणाचे मागणे :

मज राज्याची चाड नाही । ऐश्वर्य मज न लगे पाही ।
मज साधुसमागम देई । आणिक नाही मज इच्छा ॥५४॥
अखंड माझी चित्तवृत्ती । लागो संतांचे संगतीं ।
आणीक मजला भगवद्भक्ती । कृपामूर्ति देईजे ॥५५॥
जेणे होय परमपद प्राप्त । ऐसे ज्ञान दीजे निश्चित ।
यावेगळे नश्वर पदार्थ । स्वामी मज नलगती ॥५६॥
बिभीषणाचे ऐकोनि बोलणे । विरंचि आनंदाला मनें ।
म्हणे वस्ता धन्य मागणे । अवश्य जाण तुज दिधले ॥५७॥
बिभीषण म्हणे स्वामिनाथा । ज्या ज्या आश्रमी मज वर्ततां ।
तेथे तेथे बुद्धि सर्वथा । धर्मपंथा पै लागो ॥५८॥
गुरूवेगळी ब्रह्मप्राप्ती । होय ऐसी कृपा करी निश्चिती ।
माझा गुरू तूचिं प्रजापती । मी मंदमति अज्ञान ॥५९॥
परम उदारा चतुरानना । माझी बुद्धी सद्वासना ।
लागो श्रीहरीच्या भजना । आणिक मना नावडे ॥६०॥
पुनरपि तो प्रजापती । ऐकोनि बिभीषणवचनोक्ती ।
आनंदें वोसंडला चित्ती । काय मागुतीं बोलत ॥।६१॥

त्याला वरदान :

अगा ये वत्सा अवधारी । जे चीतिसील मनामाझारीं ।
ते ते पावसील मद्वरदेंकरीं । जाण निर्धारी मद्वाक्ये ॥६२॥
अमरत्व तू पावसी । वैरियांतें त्रास देसी ।
स्वधर्मकर्मी रत होसी । प्रतिपाळिसी आश्रमधर्म ॥६३॥
तदनंतरे चतुरानन । मिळोनि समस्त देवगण ।
जेथे होता कुंभकर्ण । तेथे आले समस्तही ॥६४॥

कुंभकर्णाला वर देऊ नये म्हणून देवांची ब्रह्मदेवाला प्रार्थना :

प्रजापती कुंभकर्णालागून । वर देतोसे जाणोन ।
सकळ सुरवर कर जोडोन । प्रार्थूं लागले ब्रह्मयासी ॥६५॥
अगा चतुर्वक्त्रा अष्टनेत्रा । विचारिजे पात्रापात्रा ।
तू तरि सकळांचा अधिष्ठात्रा । भूत भविष्या जाणसी ॥६६॥
हा राक्षस दुष्ट दुर्मती । वर न द्यावा ययाप्रती ।
येणे भक्षिले प्राणी नेणो किती । ऋषींसहित असंख्य ॥६७॥
येणे तपोधन भक्षिले । येणे देवांस त्रास दिधले ।
याचेनि देश उद्वस झाले । मार्ग खुंटले मार्गस्थांचे ॥६८॥
हा अधर्मी महापातकी । यातें वर न द्यावा हे बुद्धि निकी ।
प्रलोभावा माव करुनि निकी । जेणे विघ्न टळे त्रैलोक्याचें ॥६९॥
ऐकोनि देवांची विनवण । चिंतातुर चतुरानन ।
काही बुद्धि न चले जाण । तंव सरस्वती आपण तेथे आली ॥७०॥

सरस्वती कुंभकर्णाच्या जिव्हेवर विराजिली :

तंव जोडोनि कर ब्रह्मतनया । बोले स्वामी अहो विधातया ।
तुम्ही कोण चिंता कवण कार्या । ते मजप्रती सांगितसे ॥७१॥
तुमची मी आज्ञाधारी । जे सांगाल ते वंदीन शिरी ।
तंव बोले विधाता ते अवसरी । अवो सारजे परियेसीं ॥७२॥
कुंभकर्णाचे जिव्हेवरी । तुवा बैसावें कुमारी ।
देवांचे मनोरथ पूर्ण करी । जिव्हा धरी तयाची ॥७३॥
विरंचीचें शब्दरत्न । शिरी धरोनि सरस्वती आपण ।
राक्षसजिव्हाग्रीं प्रवेशोन । पुढील कथन अवधारा ॥७४॥
ब्रह्मा म्हणे पुलस्त्यकुमारा । महाबाहो महाशूरा ।
वर देतो माग चतुरा । का शरीरा पीडितोसी ॥७५॥

कुंभकर्णाने निद्रेची मागणी केली :

ब्रह्मयाचें ऐकोनि वचन । संतोषला कुंभकर्ण ।
अनेक वर्षें निद्रा दारुण । कृपा करोन मज दीजे ॥७६॥
भविष्यस्थितीं वचनें येणे । चतुरानन बोलिला हासोनि मनें ।
सुरवर आनंदले तेणे । तपोधन संतोषले ॥७७॥
राक्षसमुखांतून सरस्वती । आली आपुल्या आश्रमाप्रती ।
पुढे देवांसह प्रजापती । गगनोदरी प्रवेशले ॥७८॥

निद्रा मागितली याबद्दल कुंभकर्णाला पश्चाताप :

तदनंतरे कुंभकर्ण । मनामाजी करी विचारण ।
प्रसन्न झाला चतुरानन । काय म्या आपण मागीतलें ॥७९॥
दीर्घ निद्रा मागितली । ते समयी भुली पडली ।
किंवा देवीं मोहिनी प्रेरिली । काय झाली गति न कळे ॥८०॥
तथा तप मज झाले । माझे कष्ट वाया गेले ।
माझे पूर्वकर्म फळासी आले । तेणे झाले विपरीत हे ॥८१॥
माझिये बुद्धीस भ्रंश झाला । मज विधाता ठकोनि गेला ।
बोल आपुल्या कपाळाला । थोर तळमळा पै देत ॥८२॥
एवं बंधु तिघे जण । वरद पावोनि संपूर्ण ।
तीन्ही ताग्नीसमान । श्लेष्मांतकवना जाते झाले ॥८३॥
श्लेष्मांतकवना कैसे । जेथे भोकरीं बहुवसें ।
फळी फुलीं क्रीडती वायसें । तया प्रदेशी राहतें झाले ॥८४॥
एका जनर्दना रण । तया वनी रावण कुंभकर्ण ।
बिभीषणासमवेत जाण । सुखसंपन्न क्रीडाते झाले ॥८५॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
रावणादिवरप्रदानं नाम दशमोऽध्यायः ॥१०॥
ओंव्या ॥८५॥ श्लोक ॥३॥ एवं ॥८८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग