वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ७. उत्तरकाण्ड - अध्याय 77 › २८. लव-कुश जन्म

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088320 · अभंग क्र. २८

28.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

उत्तरकांड

॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥
शूर्पणखेचे दंडकारण्यात गमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दाशरथि वीरचूडमणी । कथा पुसे कुंभोद्भवालागूनी ।
म्हणे वरुणपुत्रातें जिंतोनी । रावणे पुढे काय केले ॥१॥
अगस्ति म्हणे वीरशार्दूळा । जमकमाता अयोध्याभूपाळा ।
पूर्णब्रह्म अवतारखेळा । खेळतोसी नटनाट्यें ॥२॥
निर्विकल्प ब्रह्म तू सनातन । विरंचि हा तुझा नंदन ।
जयानें सृष्टि केली निर्माण । ब्रह्मसृष्टि जाण म्हणिजे ते ॥३॥
तुझी आज्ञा वंदी कळिकाळ । तुझी माया हे लोका सबळ ।
तो तू आम्हाप्रति कुशळ । कथा ऐकों इच्छिसी ॥४॥
तरी ऐके गा श्रीरामचंद्रा । निर्गुणा जी गुणसमुद्रा ।
तुझिये आज्ञेनें नरेंद्रा । वाचा चारी वदती शब्द ॥५॥

रावणाकडून वरुणस्त्रियांचें अपहरण :

पुढे त्या पौलस्तिनंदनें । वरुणलोक जिंतोनि तेणे ।
महावीर मारोनि सेने । त्यांच्या स्त्रिया देखिल्या ॥६॥
सुंदरा आणि अति सुकुमारा । राजकन्या गंधर्वकन्या अपारा ।
आणि ऋषिकन्या थोरथोरा । हरिता झाला लंकेश ॥७॥
पन्नग यक्ष सुगरण । दैत्य आणि सिद्ध चारण ।
त्या समस्तांतें मारुन । स्त्रिया जाण हरिता झाला ॥८॥
स्त्रिया वाहोनि विमानी । रावण परतला घेवोनि ।
मार्ग क्रमितां योषिता जनी । खेद करिती आक्रंदे ॥९॥

त्या स्त्रियांचा विलाप :

म्हणती पूर्वी काय पाप केले । राक्षसें आमुच्या भ्रतारां मारिले ।
गणगोता निःसंतान केले । पुढे आमुतें भक्षील हा ॥१०॥
अदृष्ट आमुचे बळवंत । म्हणोनि रावणा झालों प्राप्त ।
विमानी भरोनि स्त्रिया समस्त । असे नेत लंकेसी ॥११॥
नदिया समुद्री जेंवी भरती । तेणे पूर्ण अपांपती ।
तैशा विमानी स्त्रिया नेणो किती । लंकेप्रती चालविल्या ॥१२॥
मार्गी स्त्रिया शोक करिती । एक रडती आक्रंदती ।
एक कानकेश तोडिती । एक चरफडती अति दुःखे ॥१३॥
अधोमुखें एकी करिती । एकी भूमीवरी उदकें लिहिती ।
जे रावणकुळा हो समाप्ती । ऐसे म्हणती पै एकी ॥१४॥
या स्त्रियांचे वर्णिता रुप । देखोनि लाजे कंदर्प ।
अष्टनायिकाही त्यांपुढें अल्प । लाजें समीप येवो न शकती ॥१५॥
एकीचे केश लंबायमान । एकी चंद्रवदना संपूर्ण ।
एकींचे मृगांसारिखे नयन । एकी तरुण षोडशवर्षा ॥१६॥
बाला प्रौढा मुग्धा नारी । शोक करिती नानापरी ।
म्हणती अगा ये त्रिपुरारी । कोण कर्म आमुचे ॥१७॥
तया शोकेंकरोनि जाण । काळवंडलें ते विमान ।
जेंवी अग्निहोत्राच्या धुरे जाण । गृह काळिमा पावत ॥१८॥
श्वासोच्छ्वास टाकिती । एकी पूर्वस्थिती आठविती ।
आम्हांवीण आमुचे पती । कोण गती पावतील ॥१९॥
आमुचे पुत्र आम्हांवीण । सांडीतील आपुला प्राण ।
सासू सासरे दीर भावे जाण । कोण गती करितील ॥२०॥
आम्ही पतिव्रता पतीवीण । येथे सांडूं पाहो प्राण ।
परी हा राक्षस दुर्जन । न लागता क्षण मारील ॥२१॥
रावणातें मृत्यु होता । आम्ही जावे अधःपाता ।
अथवा स्वबुद्धी प्राण त्यागितां । नरकपाता पाविजे ॥२२॥
पूर्वजन्मीं कोण आचरण । केले असेल दारुण ।
तेणे पापें रावणे धरुन । लंकाभिगमन करवितो ॥२३॥
प्रारब्ध बळवंत सृष्टी । ते भोगवितें दुःखकोटीं ।
विधात्या दुष्टें लिहिलें ललाटीं । कर्म आपुले देखोनी ॥२४॥
अदुष्ट आमुचे बळवंत । तेणे बंधन झाले प्राप्त ।
आम्हा सोडविता नाही येथ । एका अच्युतावांचोनी ॥२५॥

रावणाला शाप :

आमचें रावणे केले ग्रहण । दुष्ट दुरात्मा निंद्य जाण ।
पुढे स्त्रियांचे करिता ग्रहण । अवश्य मरण पावेल ॥२६॥
ऐसा शाप वदती कन्यका । पुढे परदार धरिता दशमुखा ।
मरण पावेल सकुळी देखा । आमचेनि दुःखकरोनी ॥२७॥
तदनंतर लंकापती । प्रवेशला लंकेप्रती ।
समस्त राक्षस पूजिती । राजा म्हणोनि लंकेचा ॥२८॥

रावणासमोर शूर्पणखेने पतिनिधनाचा विलाप केला :

इतुकियावरी काय वर्तले । शूर्पणखेने काय केले ।
येवोनि रायापुढें घडविलें । दुःखार्णवाचें भांडार ॥२९॥
रावणाच्या पायांवरी पडे । अति आक्रंदोनि दीर्घ रडे ।
अंग टाकी चहूंकडे । ललाट करे पीटित ॥३०॥
मग रावण म्हणे तियेसी । काय झाले सांग आम्हांसी ।
कवणें तू गांजिलिसी । शोक करिसी कासया ॥३१॥
वक्रदृष्टीनें तूतें । कोणी पाहिले सांग माते ।
की कोणे दाविले हातातें । त्याच्या प्राणातें घेईन ॥३२॥
बंधूचें ऐकोनि वचन । शूर्पणखा बोले आपण ।
म्हणे राया माझ्या प्राणपतीचें हनन । तुवा संग्रामी केले पै ॥३३॥
अगा ये बंधो अवधारी । तुझेनि वैधव्य माझे शिरी ।
ऐसी तुझ्या बळाची थोरी । सचराचरीं वानिजे ॥३४॥
शालक रणी मारुन । भगिनीस वैधव्य भूषण ।
तुझी कीर्ती जगी पावन । बंदिजन वाखाणिती ॥३५॥
तू निलाजिरा लंकानाथा । शालकावधाची तुज हत्या ।
येरु म्हणे तुझा भर्ता । कोणे काळी वधिला म्या ॥३६॥
येरी म्हणे काळिकेय दैत्य । मारिला तैंच माझा कांत ।
तूंचि वैरी तयासि अन्यत्र । नाही वधाकरणें ॥३७॥
तुंवा वैर करुन । काळिकेय मारिले दैत्यगण ।
तयांत माझे पतिनिधान । तुंवा तस्करें हरिले रे ॥३८॥
रावण म्हणे भगिनीप्रती । म्या युद्ध केले अगाधख्याती ।
रणमद चढला तेणे भ्रांती । आपपर नेणेंच ॥३९॥
भद्रे मजकारित्म रण । नाठवेचि मीतूंपण ।
यालागी तू आपण । दुःख दारुण न करावे ॥४०॥

शूर्पणखेला खर-दूषणांसह दंडकारण्य दिले :

अवो वत्से भय सांडीं । दुःखा करी देशोधडीं ।
भोगी निजसुख आवडी । बंधुचेनि प्रसादें ॥४१॥
मी तुज देतों मान दान । आणिक करावया संरक्षण ।
तुझे पाठीसी ठेवितो खरदूषण । बंधूचेनि प्रसादें ॥४२॥
दंडकारण्य जनस्थानी । ब्रह्मगिरी समीप तेथोनी ।
गोदा अरुणा वरुणा त्रिवेणी । ओघ पूर्ण ते ठायी ॥४३॥
पद्मपुरनाम नगर । दूषणेंसीं तुम्ही वसावें सत्वर ।
शाप वदला भृगुमुनिवर । जे दंडकी राक्षस असतील ॥४४॥
मान देवोनि मुनीच्या वचना । तुम्ही तेथे करावे गमना ।
चवदा सहस्त्र राक्षससैन्या । घेवोनि तुम्ही पै जावे ॥४५॥
तेथे होईल तुमची कीर्ती । खरदूषणांही शीघ्रगती ।
जावे वेगी पद्मपुराप्रती । ऐसे नृपती बोलिला ॥४६॥
ऐकोनि रावणाचे वचन । शूर्पणखा बंधुसहित ससैन्य ।
वेगी विमानी आरुढोन । दंडकारण्य पावली ॥४७॥
खरदूषणां पद्मपुरींचें । राज्य दिधले रावणे साचे ।
शूर्पणखेसी प्रधानत्व तेथींचे । लंकानायके पै केले ॥४८॥
शूर्पणखेचे प्रीतीकरुन । रावण वसवी दंडकारण्य ।
एका जनार्दना शरण । रामायण अति रम्य ॥४९॥
स्वस्ति श्रीभावार्थरामयणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
शूर्पणखाखरदूषणदंडकारण्यप्रवेशो नाम अष्टाविंशतितमोऽध्यायः ॥२८॥ ओंव्या ॥४९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग