संसाराची कोण गोडी ।
2696.
संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥
निष्ठुर तू बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥धृपद॥
पाहोनिया कर्म डोळा । निराळा तो वर्जीना ॥२॥
तुका म्हणे तुज माझे । म्हणता ओझे फुकट ॥३॥
अर्थ :
देवा या संसारामध्ये अशी कोणती गोडी आहे की ज्यामुळे तू आम्हाला याचा लाभ करुन दिला आहे. परंतू हे देवा तू फार निष्ठूर आहेस कारण आमच्या कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी आता बास झाले असे देखील तू आमच्याकडून म्हणून घेत नाहीस. देवा आम्ही केलेले सर्व कर्मे तू तुझ्या डोळयाने पाहातो आम्हाला त्यापासून वेगळे तू काही करीत नाहीस परंतू याउलट तू काय करतोस तर या सर्वपासून वेगळा होऊन राहातो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तुमचा म्हणणे हे तुम्हाला फुकटचे ओझेच वाटत आहे काय ?
