घनु वाजे घुणधुणा ।
879.
घनु वाजे घुणधुणा ।
वारा वाजे रूणुझुणा ।
भवतारकु हा कान्हा ।
वेगी भेटावा का ॥१॥
चांदवो चांदणे ।
चापेवो चंदनु ।
देवकीनंदनेवीण नावडे वो ॥२॥
चंदनाची चोळी ।
माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी ।
वेगी भेटवा का ॥३॥
सुमनाची सेज ।
सितळ वो निकी ।
पोळे आगिसारिखी ।
वेगी विझवा का ॥४॥
तुम्ही गातसा सुस्वरे ।
ऐकोनी द्या उतरे ।
कोकिळे वर्जावे ।
तुम्ही बाईयांनो ॥५॥
दर्पणी पाहता ।
रूप न दिसे आपुले ।
बापरखुमादेविवरे विठ्ठले मज ऐसे केले ॥६॥
अर्थ :
मेघाचा घुणु घुणु असा सुंदर आवाज येत आहे. वारा झुळुझुळु आवाज करीत आहे. अशा स्थितित त्या भवतारक श्रीकृष्ण भेटीची तळमळ लागलेली विरहिणी आपल्या मैत्रिणीला सांगते. त्या श्रीकृष्ण परमात्याला लवकर आणून भेटवा. त्या श्रीकृष्ण परमात्म्यावांचून हे सुंदर चंद्र चांदणे व सोनचाफ्याची फुले किंवा चंदनाची उटी यापासून मला काही शांतता मिळत नाही. एकट्या देवकीनंदन श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय मला काही आवडत नाही. ही पहा चंदनाची चोळी जसी काही माझे सर्वांगाला पोळत आहे. याकरिता तो कान्हो वनमाळी मला लवकर भेटवा. ही पुष्पशय्या अत्यंत शीतळ आहे खरी पण त्या श्रीकृष्ण परमात्म्यावांचून मला अग्नीसारखी पोळत आहे. ती लवकर विजवा. तुम्ही कोकिळासारखे सुंदर गीत माझ्या पुढे गात आहात, पण ते मला ऐकायला सुद्धा नको. तर मी तुम्हांस विचारलेले ते ऐकून उत्तर द्या. फार काय सांगू? हातांत आरसा घेऊन मी पाहाण्याला गेले तर माझे रूप सुद्धा मला दिसत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्याने मला असे वेडी करून टाकले आहे. म्हणजे मला त्याच्या प्राप्तिविषयी तळमळ लागलेली आहे. असे माऊली सांगतात.
