जे जे वहावे संकल्प ।
3128.
जे जे वहावे संकल्प । तेचि पुण्य तेचि पाप ॥१॥
कारण ते मनापासी । मेळविल्या मिळे रसी ॥धृपद॥
सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥२॥
तुका म्हणे सार । नांव जीवनाचे सागर ॥३॥
अर्थ :
मनामध्ये जे जे कोणते संकल्प करावे त्यापासून जे कर्म करावेत त्यापासून पुण्य किंवा पाप निर्माण होते. याला मुख्य कारण म्हणजे मन आहे सर्व कार्य मनापासूनच उत्पन्न होतात मनाला ज्या विषयाची आवड लागते त्याच विषयामध्ये ते मिसळून जाते. संसारातील सर्व उठाठेव ह्याच आणि या मनाच्या आधारानेच होत असतात आणि जो कोणी मनाला एकाग्र करुन हरीशी एकरुप करील त्यालाच चांगले म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात, पाणी कोठेही असो त्याचे मूळस्वरुप म्हणजे सागर आहे त्यामुळे पाण्याचे मुख्य नांव समुद्र आहे त्याप्रमाणे क्रिया कशाही प्रकारे घडो त्याला मुख्य कारण मनच आहे.
