अवघ्या कळा याचे हाती
1198.
अवघ्या कळा याचे हाती ।
न करी काय एक श्रीपती ।
विष पाजिता अमृती ।
केली तृप्ती प्रल्हादा ॥१॥
चंद्रहास्याचा कैवारी ।
रक्षिले त्या महामारी ।
राज्य देऊनिया मुरारी ।
वैष्णवांमाजी श्रेष्ठ केला ॥२॥
अर्जुनाची प्रतिज्ञा गहनु ।
देखोनि दिवसा लोपिला भानु ।
जयद्रथासि यमसदनु ।
प्राप्त केला तात्काळी ॥३॥
गर्भी रक्षिला परीक्षिती ।
सुदर्शन चक्र घेउनि हाती ।
उदरी प्रवेशोनिया श्रीपती ।
छेदिली शक्ति अनिवार ॥४॥
द्रौपदीच्या वस्त्रहरणी ।
उडी घालूनिया ततक्षणी ।
केली वस्त्राची पुरवणी ।
लाजविली कौरवे ॥५॥
गजेंद्रे संकटी धावा केला ।
वैकुंठी याते तो जाणो आला
येऊनि तांतडी मग सोडविला ।
विमानी नेला बैसवूनी ॥६॥
निळा म्हणे ऐसी किती ।
तारिली ताराल तुम्ही पुढती ।
जया तुमच्या नामी प्रीति ।
ते ते होती आप्त तुम्हा ॥७॥
