भक्ताचे हृदयची जाणोन
1790.
भक्ताचे हृदयची जाणोनि अवस्था | आला शरणागता लोभापरू ॥१॥
संता पुसे माझे दाखवा रे नामे | तुम्हा समागमे खेळे सदा ॥२॥
दृष्टिसी दाटले कृपेचे भरिते | म्हणे ते आवडते केऊते गेले ॥३॥
निरजळे नयनी कोमायिले वदनी | आणा रे गवसुनि आळीकरे ॥४॥
तंव तो वाट पाहत होता परलक्षी | भेटी देऊनि सुखी केला देवे ॥५॥
नामा म्हणे विठो तू माझा सुखराशी | झणी दूर जासी हृदयींचा ॥६॥
