जेथुनीया परापश्यंती
141.
जेथुनीया परापश्यंती वोवरा । मध्यमा निर्धारा वैखरी वाहे ॥१॥
ते रूप सुंदर नाम ते श्रीधर । जेणे चराचर रचियेले ॥२॥
वेदाचे जन्मस्थान वेदरूपे आपण । तो हा नारायण नंदाघरी ॥३॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ । गोपिकांचे हित करि माझा ॥४॥
अर्थ:
परा, पश्यंती, मध्यम, वैखरी हे वाणीचे सर्व प्रकार परमात्माचे वर्णन करु शकत नाहीत व शेवटी आपल्या हद्दीतील ओवरीत निवांत पडुन राहतात. तो नितांत सुंदर अ़सलेला श्रीधर ह्या चराचराचा निर्माता आहे. वेदांचे जन्मस्थान असलेला तो वेदरुप परमात्मा नंदाघरी नारायण झाला आहे.निवृत्तिनाथ म्हणतात, तो गोपिकांचे हित करणारा माझा देव माझे मनोरथ पूर्ण करतो.
