तुम्ही संत मायबाप कृ
2425.
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणू ॥१॥
अवतार तुम्हा धराया कारणे । उद्धरावे जन जड जीव ॥धृपद॥
वाढविले सुख भक्ती भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचे ॥२॥
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी । तैसे तुम्ही जगी संतजन ॥३॥
अर्थ :
हे संत जण हो तुम्ही मायबाप कृपावंत आहात त्यामुळे मी पतीत तुमची कीर्ति वर्णन तरी कशी करू? तुम्ही अवतार घेता याला कारण म्हणजे जड मूढ अज्ञानी जीवाचा उद्दार करण्यासाठीच. हे संत जण हो तुम्ही अवतार घेऊन भक्ती, सुख, धर्माचरण, कुळाचार आणि विठोबाचे नाम वाढविले आहे. तुकाराम महाराज म्हणतात चंदनाच्या झाडाच्या अंगी एक गुण आहे तो म्हणजे चंदनाच्या झाडा जवळ जे काही बोरीबाभळी इतर वृक्ष आहेत त्यांनाही तो आपल्याप्रमाणे सुगंधी करतो तसेच तुम्ही संतजन आहात तुम्ही जगामध्ये अवतार घेता आणि जगातील जड अज्ञानी जीवांना तुमच्याप्रमाणेच ब्रम्हस्वरूप करत असतात.
