स्फूर्तिरूप तेथे माय
462.
स्फूर्तिरूप तेथे मायेचा उद्भव ।
प्रपंचासी ठाव मूळ तेथे ॥१॥
ब्रह्म एकले ते गमेना म्हणोनि ।
स्फूर्ती हे चिंतनी स्वसंवेद्य ॥२॥
उदकी बाबुळ होऊनि निर्माण ।
तेणेचि ते जाण आच्छादिले ॥३॥
तैसे जाले जाण, ब्रह्मीचीच माया ।
लपोनिया तया प्रगटली ॥४॥
अग्नीचे पासाव धूम्राची उत्पत्ति ।
तयाची प्रदीप्ती लोप करी ॥५॥
डोळ्यांचे पडळ डोळियासी रोधी ।
काजळी ते बाधी दीपकासी ॥६॥
आम्रवृक्षी होय कावरे निर्माण ।
तयासीच जाण आच्छादले ॥७॥
बहेणि म्हणे तैसी माया आच्छादित ।
सद्गुरूचा हस्त नाही तरी ॥८॥
