निरालंब सार निर्गुण
59.
निरालंब सार निर्गुण विचार । सगुण आकार प्रगटला ॥१॥
ते रुप सुंदर शंखचक्रांकित । शोभ अनंत यमुनातटी ॥२॥
अपाय उपाय आपणचि होय । सिध्दीचा न साहे रोळु सदा ॥३॥
सर्व हे घडले कृष्णाचे सानुले । घटमठ बुडाले इये रुपी ॥४॥
सर्वसुखमेळे नामाकृती वोळे । सिध्दिचे सोहळे कृष्णनामी ॥५॥
निवृत्ति तटाक घट मठ एक । कृष्ण हा सम्यकु नामरुपे ॥६॥
अर्थ:
जे परब्रम्ह कोणावर अवलंबुन नाही ते निर्गुण आहे ते सगुण होऊन साकारले. शंखचक्रगदा घेऊन ते सुंदर रुप घेऊन यमुना तटी आले. जो अपायांवर उपाय आहे.त्याकडे येण्यास अष्टमा सिध्दी ही स्वतःला रोखु शकल्या नाहीत. कृष्ण रुपात ज्या लिला केल्या त्यामुळे भगवान लहान दिसत असले तरी अमर्याद शक्ती ठेऊन असतो. त्याच्या त्या सानुल्या रुपात घट मठादी सिध्दांत लोप पावले. हे कृष्ण नाम घेतलावर सर्व सुखाची प्राप्ती तसेच सर्व सिध्दी ही आपसुक मिळतात. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या नामप्रभावामुळे घट व मठातील पोकळी ही भरते म्हणजे सिध्दांत सिध्द होतात.हे सामर्थ त्या कृष्ण नामात आहे.
