साधनाचे कष्ट मोठे ।
3107.
साधनाचे कष्ट मोठे । भय वाटे थोर हे ॥१॥
मुखे गावे भावे गीत । सर्व हित बैसलिया ॥धृपद॥
दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥
तुका म्हणे आत्मनिष्ठा । भोग चेष्टा मनाची ॥३॥
अर्थ :
देवा तुमच्या प्राप्तीसाठी योग याग जप तप अनुष्ठान ही साधने मोठी कष्टदायक आहेत आणि ती साधने करताना चूक होती की काय याचेही फार भय वाटत आहे. एवढे करण्यापेक्षा मुखाने हरीचे गीत भक्तीभावपूर्वक गावे असे केल्याने बसल्या जागेवरच आपले सर्व हित होईल. हरीच्या दासांना कोणत्याही प्रकारचे दानधर्म नसते त्यांनी केवळ एक ठिकाणी बसून तन मन हरीच्या ठिकाणी निश्चल करावे. तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी आत्मनिष्ठ आहेत त्यांचे मन देखील निश्चल असते परंतू विविध प्रकारचे भोग भोगण्याची ज्यांची इच्छा असते ते म्हणजे केवळ मनाच्या नाना चेष्टाच असतात.
