(पाईकाचे अभंग)
3631.
(पाईकाचे अभंग)
पाईक तो जाणे पाईकींचा भाव । लगबग ठाव चोरवाट ॥१॥
आपणा राखोनि ठकावे आणीक । घ्यावे सकळीक हिरूनिया ॥धृपद॥
येऊ नेदी लाग लागो नेदी माग । पाईक त्या जग स्वामी मानी ॥२॥
ऐसे जन केले पाईके पाईक । जया कोणी भीक न घलिती ॥३॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाईक त्रैलोकींचा ॥४॥
अर्थ :
जो खरा सेवक आहे त्यालाच माहित असते की सेवक होण्यासाठी कोणते कौशल्य अंगी असावे आणि त्याला हेही माहित असते की जरी वेळप्रसंगी शत्रूच्या तावडीत आपण सापडलो तर तेथून लगबग करुन बाहेर पडण्यासाठी चोरवाटा कोणत्या आहेत, वेळप्रसंगी कसे वागावे, कोणत्या प्रकारच्या युक्त्या कराव्यात हे देखील त्याला माहित असते. असे जे शूर शिपाई आहेत त्यांना आपल्याजवळचे रक्षण कसे करावे आणि शत्रूला कसे फसवावे तसेच शत्रूजवळच्या वस्तू किंवा इतर मौल्यवान वस्तू कशा लुटून आणाव्यात हे देखील त्यांना कळते. परंतू लुटून आणलेल्या मालाचा आरोप आपल्यावर येऊ नये तसेच शत्रूही आपल्या पाठीमागे लागू नये अशा प्रकारे जो वर्तन करतो त्या शिपायाला त्याचा स्वामी मान तर देतोच परंतू सारे जग त्याला मान्यता देते. ज्या लोकांना कोणी भीक घालीत नाही अशा लोकांना हा खरा स्वामी सेवक आपल्याबरोबर घेतो आणि त्याला देखील आपल्यासारखे निपुण करुन त्याला देखील जगामध्ये मान्यता मिळवून देतो. तुकाराम महाराज म्हणतात, असे शूर शिपाई ज्या राजाच्या अधिपत्याखाली काम करतात तो राजा त्रैलोक्यामध्ये अतिशय नेक असून सर्वात बलवान असतो. (सारांश :- देवाच्या देखील सेवकाने असेच लपून छपून काम क्रोधरुपी शत्रूवर हल्ला करुन त्यांचा पराभव करावा. )
