अंजनी संपूर्ण ठेऊनिय
639.
अंजनी संपूर्ण ठेऊनिया मन ।
ज्ञानी ज्ञान घन निरालंबी ॥१॥
आदि मध्य आंतु नसोनिया दिसे ।
पाठी पोंटी वसे निघोट रया ॥२॥
श्रवण नयन जाति गोतपण ।
जीवशीवा खूण आत्मपणे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे वाच्या वाचक योगे ।
हरिवीण वाउगे नाही रया ॥४॥
अर्थ :
निरालंब म्हणजे ज्याला स्वरुपाशिवाय दुसरा आधार नाही. अशा ज्ञानघन परमात्मरुप अंजनाचे ठिकाणी संपूर्ण मन ठेवून ज्ञानोदय झाला असता, नसून दिसणाऱ्या सर्व त्रैलोक्याच्या आदि मध्ये अंताला व पाठी पोटीही निघोट म्हणजे निष्प्रतिबंध ज्याची व्याप्ति दिसत आहे. ती केवळ परमात्म्याचीच आहे. जातीगोताची अडचण मनांत न आणता, वाच्य वाचकाचे रितीने जीव शीवाचे आत्मरुपाने 'ऐक्य समजून ' श्रवण नयन' म्हणजे कानानी ऐकणे किंवा डोळ्यांनी पाहाणे हे एक परमात्मविषयाला करावे. वाच्य वाचक हे सर्व हरिच आहे. त्याच्यावाचून सर्व मिथ्या आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
