(सौरी, स्वैरिणी)
3964.
(सौरी, स्वैरिणी)
साते चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारी बैसले पारी नाचो फेर धरा ॥१॥
या साहेबाचे झाले देणे वेळोवेळा न लगे येणे । आता हाटी काशासाठी हिंडो पाटी दुकाने ॥धृपद॥
अवघ्या जणी मुंढा धणी नाचो एके घाई । सरसावले सुख कैसा चाळा एके ठायी ॥२॥
म्हणे तुका वोळगो एका तोड चिंता माया । देऊंनिया उद्गार जाऊ मुळींचिया ठाया ॥३॥
अर्थ :
हे बयांनो तुम्ही डोळयामध्ये ज्ञानरुपी काजळ घाला हरीविषयी स्नेहरुपी तेल केसाला लावा पश्चात्तापाच्या फणीने अंत:करणातील विकार विंचरा, बुध्दीची वेणी चांगली बांधा आणि पंढरीच्या बाजारात चला आताच दारासमोरुन संतरुपी दिवान गेले आहेत ते पारावर बसले आहेत त्यांच्यापुढे जाऊन आपण फेर धरुन नाचू या चला. या संतरुपी साहेबांचे आपल्यावर ज्ञानदानाचे खूप मोठे कर्ज आहे एकदा की, आपण त्यांच्यापुढे जाऊन नाचलो की, मग ते कर्ज फिटले जाईल मग पुन्हा आपल्याला त्यांचेकडे येणे जाणे नाही आणि एकदा की त्यांनी आपल्यावर कृपा केली तर संसाराच्या बाजारात विषयांच्या दुकानापुढे उभे राहून हिंडण्याची देखील आपल्याला काहीच गरज नाही. आता आपण सर्वजणींनी मुंडा जो आपला धनी पाडूरंग आहे त्याच्यापुढे जाऊन एक घाई धरुन नाचू या. एकदा की आपल्याला आत्मस्थिती प्राप्त झाली की मग इतर चाळे करण्याचे आपल्याला सुचेलच कसे ? तुकाराम महाराज म्हणतात, एका हरीच्या ठिकाणीच आपण शरण जाऊन चिंता, माया तोडूया आणि त्याच्याच ठिकाणी सर्व गार्हाणे सांगून आपल्या मूळ स्वरुपाच्या ठिकाणी जाऊ या.
