(व्यभिचारिणी स्त्रीच
3423.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
आधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलिये ॥१॥
रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आता । रातले अनंता तुका म्हणे ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)चित्तरुपी स्त्री म्हणते की माझा पहिला संसाररुपी नवरा माझ्या इच्छा पूर्ण करत नाही त्यामुळे मी परपुरुषाकडे म्हणजे श्रीहरीशी व्याभिचार करण्यासाठी प्रवृत्त झाले आहे. तो परपुरुष म्हणजे श्रीहरी मला रात्रंदिवस माझ्याजवळच पाहिजे त्याच्यावाचून एक क्षणभर देखील मला वेळ जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोकहो तुम्ही आता मला माझ्या पहिल्या नवऱ्याकडे म्हणजे संसाराकडे नेण्याविषयी काही समजून सांगू नका माझे तुम्ही नांव विसरुन जा कारण मी आता परपुरुषाशी म्हणजे या अनंताशी एकरुप झाले आहे.
