वेरझारी जाला सीण । ब
2011.
वेरझारी जाला सीण । बहु केले खेदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथे फावला ॥१॥
आता काय भीड भार । धरूनिया लोकांचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥धृपद॥
आले बहुतांच्या मना । का रे न होशी शहाणा । मुळींच्या वचना । आह्मी जागो आपुल्या ॥२॥
तुका म्हणे चौघांमधी । तुज नेले होते आधी । आता नामधी । उरी काही राहिली ॥३॥
अर्थ :
देवा तुझ्या घरी खूप येरझाऱ्या आम्ही घातल्या आहेत तरीही तु आम्हाला काहीच दिले नाही त्यामुळे आम्हाला खूप शीण झाला आहे व त्या गोष्टीचा आम्हाला खूप खेद ही वाटत आहे आणि आम्हाला त्रास ही खूप झाला आहे. आता बरे झाले तुझ्याशी भांडण करण्याकरता आजचा दिवस सापडला. देवा मी आता तुझी भीडभाड तरी किती दिवस धरू या लोकांमध्ये तुझे मर्यादा तरी किती दिवस बाळगू? देवा आता मी सर्व तुझ्या मर्यादीचा व्यवहार बुडवणार आहे आणि तुझ्यासारखाच सच्चिदानंदरुप होणार आहे. देवा तुझ्या सारखेच व्हावे असे खूप संतांच्या मनातही आले आहे तरीही तु शहाणा का होत नाहीस? देवा आम्ही मात्र आमचे जे वचन आहे तुझी सेवा करणार या वचनाला आम्ही आज पर्यंत जागे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुला याआधी चारचौघात संतांमध्ये नेले होते. त्यामुळे आता आपल्या दोघामध्ये काहीच भांडण राहिलेली नाही.
