(डाकाचरूपक)
3913.
(डाकाचरूपक)
विनंति घातली अवधारी । मज देई वो अभय करी । पीडिलो खेचरी । आणीक वारी नावांची ॥१॥
रंगा येई वो । एकला रंग वोढवला । हरीनामे उठिला । गजर केला हाकारा ॥धृपद॥
देवांचे दैवते । तुज नमिले आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धावत ॥२॥
न लवी आता वेळ । आइती सारीली सकळ । तूका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥३॥
अर्थ :
हे विठाई तू हात वर करुन मला अभयाचे आश्वासन दयावेस. देवा मला काम, क्रोधरुपी भूतांनी फार त्रास दिला आहे. अजूनही असे वेगवेगळया नावाचे पंचमहाभूत आहे त्यांनी मला खूप त्रास दिला आहे त्या सर्वांचे तू निवारण कर. हे श्रीरंगा आज किर्तनाचा रंग खूप वाढला आहे त्यामुळे तू एकटयानेच यावे. आज येथे किर्तना मध्ये हरीनामाचा गजर उठला आहे आणि मी तुला हाक मारीत आहे. देवतांचे दैवत असलेल्या आदिनाथा मी तुला नमन करत आहे. हे कृपावंते माझे भोग नष्ट करण्यासाठी तू धावत माझ्याकडे यावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझे विठाबाई आता तू येण्यास वेळ लावू नकोस मी पूजेची सर्व तयारी केली आहे. हे माझ्या कुळदैवते मी अशी तुम्हाला विनंती करत आहे.
