वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ८. अंगदाचे रावणाकडे शिष्टाई

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088121 · अभंग क्र. ८

8.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय आठवा ॥
अंगद – शिष्टाई वर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रावणाची दुर्दशा :

मागिले प्रसंगीं जाण । वामनें गांजिला रावण ।
तिज्या रावणाचे प्रकरण । सांगे आपण अंगद ॥१॥
पूर्वप्रसंगी स्वभावतां । जाली दो रावणांची कथा ।
तिज्या रावणाची प्रौढता । ऐक तत्वता लंकेशा ॥२॥
परिसतां अंगदवचन । रावणा हृदयी खोंचती बाण ।
कांही न चले आंगवण । ऐके आपण कुसमुसित ॥३॥

श्वेतद्विपातील फाजिती :

एक रावण मूर्खावेशी । स्वये निधाला श्वेतद्वपासी ।
तेथे गति न चले विमानासीं । सेवकांसीं अगम्य ॥४॥
मागे सांडोनि विमान । राहवोनियां सेवकजन ।
एकला निघे रावण । मूर्खाभिमान । आक्रोशी ॥५॥
श्वेतद्विपीचें राज्य समस्त । करावया हस्तगत ।
येणे अभिलाषें लंकानाथ । असे जात श्वेतद्विपा ॥६॥
श्वेतद्विपासी स्वये जाण । नारद जाऊ न शके आपण ।
तेथैं बापुडे रावन । सशक कोण प्रवेशे ॥७॥
रावण चालता षण्मास । श्वेतद्वीप न ठाके त्यास ।
मार्गी शिणला बहुवस । परम क्लेश पावला ॥८॥
न कळे उदय अस्तमान । न मिळे अन्न ना जीवन ।
नसे बसाव्या वस्तीचें स्थान । दशानन अति दुःखी ॥९॥
पुढे लक्षेना पै स्पष्ट । मागे यावया भुलला वाट ।
भ्रमणचक्रीं दशकंठ । परम कष्ट पावला ॥१०॥
निरंजनी विजनवासीं । रावण रडे उकसाबुकसीं ।
कोण संबोखील त्यासी । परदेशी एकाकी ॥११॥
जळ न्यावया नगराआंत । गंगा प्रवाहे श्वेत ।
जळ वाहका दासींची मात । ऐके निवांत रावण ॥१२॥
जळ वाहता देखोन दासी । रावण जाला अति उल्लासी ।
मी पावलों श्वेतद्वीपासी । हरिखें तीपासीं पुसों आला ॥१३॥
देखोनिया दशमुखासी । स्वये विनोदे धरिती त्यासी ।
खेळणें करावया दशशिसीं । कौतुकेंसीं आणिला ॥१४॥
दहा मुखें वीस हात । दहाही शिरें मुकुटांकित ।
अभिनव किडे आले तेथ । दासी धरित साक्षेपे ॥१५॥
सोडवावया आपणाप्रती । न चले रावणाची शक्ती ।
जेंवी का चिडिया पारध्याहांतीं । तैसिया रीती धरियेला ॥१६॥
पारध्या हाती चिडी चिचात । दासीपासीं लंकानाथ ।
अडकला कुंथत कुंथत । कांही सामर्थ्य चालेना ॥१७॥
धरिला देखोन दशानन । भोंवते मिळाले पै जन ।
विनोदे अवघे जण । करिती छळण ते ऐका ॥१८॥
काड्या घालोनिया नासी । विचकाविती दहाही मुखांसी ।
टोले हाणोनियां शिसी । डोळे विसी मिचकावी ॥१९॥
एके हाणोनिया लात । एक हरणुली नाचवित ।
एक गटांगळ्या देत । अवघेही दांत विचकावया ॥२०॥
काकस्वरें श्वानस्वरें । खरस्वरें जंबुकस्वरें ।
भुंकविती पै लेंकुरे । घुघुस्वरें पै एक ॥२१॥
एक घालविती कोल्हाटे । एक घालविती हेलाटे ।
दुःख पावोनि दशकंठें । म्हणे येथे कोठे मी आलो ॥२२॥
अवघ्या मिळोनिया दासी । चेंडू करोनि रावणासी ।
एक टाकिती एकीपासीं । एकी चौपासी धांवती ॥२३॥
एकी टाकिती एकीवरी । एकी झोलिती माझारी ।
एकी उडविती वरच्यावरी । दुःख दुर्धर रावणा ॥२४॥
जळो ते माझी शौर्यशक्ती । जळो ते माझी प्रताव्यक्ती ।
जळो ते माझी यश कीर्ती । दासी झेलिती तृणप्राय ॥२५॥
चाकांटली माझी बुद्धी । विध्वंसली माझी शुद्धी ।
येथे का आलो मी दुर्बुद्धी । पडिलों बंदी दासींच्या ॥२६॥
दासी परस्परें टाकिती । रावण डसला एकीचें हाती ।
चाविरें म्हणोनि निश्चिती । झुगरिती लंकेसी ॥२७॥
आदळता लंकापुरीं । सवोष्ट दातांची चकचुरी ।
नाक चेंदलें वाहे रुधिरीं । राजद्वारी आकांत ॥२८॥
ऐसा कोण निधडा दादुला । अंतरिक्षीं संग्राम केला ।
तेथोनि रावण झुगरिला । तो आदळला लंकेसी ॥२९॥
इंद्रजितासहित कुमरजन । वृत्तांत पुसती प्रधान ।
रावण झाला लज्जायमान । प्रतिवचन नेदीच ॥३०॥
तिज्या रावणाची ख्याती । श्वेतद्विपगमनानुवृत्ती ।
सांगितली सर्वही तुजप्रती । यथानिगुतीं लंकेशा ॥३१॥

वालीच्या तावडीत :

चौथ्या रावणाची स्थिती । अतिशये अभिनव कीर्तीं ।
ते मी सांगेन तुजप्रती । लंकापते अवधारी ॥३२॥
चवथा रावण आतुर्बळी । ध्यानस्थ देखोनिया वाळी ।
त्यासी धरिता कपटमेळीं । तेणे काखेतळीं दडपिला ॥३३॥
रावण घालोनि काखेतळी । स्वेग उडोनियां वाळी ।
सप्तसमुद्रीं करोनि आंघोळी । ध्यानानुमेळीं बैसला ॥३४॥
रावणा दृढ लागली कळ । चरफडी परी न चले बळ ।
नाकीं तोंडीं भरले कक्षाजळ । जाला विकळ ते काळी ॥३५॥
निजभवना येता वाळी । अंगद उचलितां सुखसेळीं ।
काखेचा रावण पडिला तळी । वानरी सकळीं देखिला ॥३६॥
वीस भुजा दश शिर । मुकुट कुंडले मनोहर ।
कंठी विविध विचित्र हार । अति सुंदर अंगदिप्ति ॥३७॥
पाचू पदक हृदयावरी । मुक्ता फळांच्या झालरी ।
कटिसूत्र कटीवरी । झळकत हारी क्षुद्रघंटा ॥३८॥
ऐसा देखता वानरी । अंगदाच्या पाळण्यावरी ।
रावण बांधिला खेळण्यावारी । हेमसूत्री शृंखळा ॥३९॥
बाळलीलापदसंचारी । लाथा हाणी मुखावरी ।
अंगदमुत्राची धार थोरी । रिघे मुखांतरी रावणाच्या ॥४०॥
चिमटितां वानरवानरीं । दांत विचकी नानाविकारीं ।
टोले देता शिरावरी । डोळे त्यांवरी मिचकावी ॥४१॥
लाता हाणिता संमुखा । क्षतें पडली दहाही मुखां ।
अंगद पारखी निका । तेणे दशमुखा लोळखिलें ॥४२॥
अंगद म्हणे त्यातील तू कोण । हे पुसावे न लगे जाण ।
माझे लातांचे वण । तुझे मुखी संपूर्ण दिसती ॥४३॥
माझ्या मुताची बाळधार । तुझे मुखी पडता निरंतर ।
तेही चिन्हें उभय अधर । घांसली कोर दिसतसे ॥४४॥
तो तू अतिशये हीन दीन । भद्रीं बैसलासि रावण ।
तुज कैंची आंगवण । करावया रण रामासीं ॥४५॥

त्याचा रावणावर परिणाम त्याची धमकी :

अंगदाचे वाग्बाण । हृदयी खोंचले संपूर्ण ।
तेणे तळमळी रावण । वचनें प्राण जाऊ पाहे ॥४६॥
अंगदवाक्य खडतर । शतधा खोंचलें जिव्हार ।
तेणे तळमळी दशशिर । सर्वथा वानर नाटोपे ॥४७॥
अंगद नाटोपे वचनानुमेळीं । अंगद नाटोपें करिता कळी ।
अंगद बैसला आतुर्बळी । रावण चळीं कांपत ॥४८॥
अंगदासीं करावया रण । स्वये साशंकित दशानन ।
कुमर कांपती प्रधान । कंपायमान राक्षस ॥४९॥
हनुमंते लाविला धाक । त्याहुनि अंगद निःशंक ।
तेणे धाके एकएक । सैन्य सेवक सेनानी ॥५०॥
ऐसे देखोनिया चिन्ह । बुद्धिवंत दशानन ।
अति कोपे हास्यवदन । काय आपण अनुवादे ॥५१॥
सभेसीं बैसोनि वानरा । किती जल्पसी सैरावैरा ।
तोंडी नाही वोढावारा । दशशिरा नोळखसी ॥५२॥
ऐक माझी आंगवण । वंदी घातले सुरगण ।
श्रीराम बापुडे ते कोण संमुख रण करावया ॥५३॥
माझी वाजताचि हाक । सुरासुरी अति धाक ।
श्रीराम बापुडे मशक । मजसंमुख केंवी राहे ॥५४॥

इंद्रं माल्यकरं सहस्त्रकिरणं द्वारे प्रतिहारकं ।
चंद्रं छत्रधरं संमीरवरुणौ संमार्जयंतौ गृहान् ।
पाच्यत्वे परिनिष्ठितं हुतवहं कि मद्‌गृहे नेक्षसे
रक्षोभक्ष्यमनुष्यमात्रवपुषं त्वं राघवं स्तौषि किम् ॥१॥

रावणाची अवस्तव आत्मस्तुती :

रणी करोनिया दुर्धर मार । बंदीं घातले सुरवर ।
कामार केले समग्र । तोही प्रकार अवधारी ॥५५॥
पाचारोनि कुसमाकर । विचित्र शेजा विचित्र हार ।
इंद्रें आणावे सत्वर । माल्यधर तो केला ॥५६॥
सूर्य जो का सहस्रकर । द्वारपाळ निरंतर ।
मलयानिळ चवरधर । चंद्रें छत्र धरावें ॥५७॥
वायूचा अधिकार जाण । बिदी झाडाव्या संपूर्ण ।
वरुण येवोनि आपण । सडासंमार्जन करावे ॥५८॥
स्वये न लावितां इंधन । फुंकिते रांधिते नसोन ।
अग्नि निपजवी अन्न पक्वान्न । सूपविधान शास्त्रार्थें ॥५९॥
जाहलिया पाकविधान । स्वये अग्नीनें आपण ।
करावे वस्त्रक्षाळण । रंग राखोन सावध ॥६०॥
सबळ डाग बैसले पोटी । ते काढावे उठाउठी ।
जावों न द्यावी का नवटी । कळमळवटीं फेडावीं ॥६१॥
जळावांचून सकळ मळ । सबाह्य करावे निर्मळ ।
ऐसा क्षाळक कुशळ । अधिकारी प्रबळ नेमाचा ॥६२॥
विधि दळकांड करी । चंडी तराळी माझे नगरी ।
माझ्या सामर्थ्याची थोरी । घरोगरीं पाहे पा ॥६३॥
बृहस्पति माझे कीर्तींचा भाट । बह्मा नित्य जपे शांतिपाठ ।
माझ्या सामर्थ्याचा लोत । अति वरिष्ठ तिही लोकी ॥६४॥
राम बापुडे मानवी नर । आमुचे खाजुकें ग्रासमात्र ।
वानर जे का पालेखाईर । धाकेंचि समग्र निमतील ॥६५॥
मुख्य भक्ष्य राम लक्ष्मण । वानर तिखटें कोशिंबिरी जाण ।
एकेंचि घांसे कुंभकर्ण । भक्षील आपण निमेषार्धे ॥६६॥
शंभुसमवेत गौरी । म्या आंदोळिला कैलासगिरी ।
त्या मज रावणाची थोरी । चराचरी अतुळित ॥६७॥
तो मी ऐकता दशानन । मानवी श्रीरामाचे स्तवन ।
अंगदा वल्गसी गर्जोन । आनेंआन सैराचि ॥६८॥
श्रीरामे कोंठे केले रण । कोणे दमिला वीर दारुण ।
मारिले त्रिशिरा खर दूषण । हेचि उचकण मज देशी ॥६९॥
ऐसे बोलता दशानन । अंगद वक्ता अति सज्ञान ।
श्रीरामाचे गुण गर्जोन । वदे संपूर्ण पुरुषार्थ ॥७०॥

अंगदाकडून रावणाचा धिक्कार :

धिग् धिग् रावणा तुझी कथा । संमुख न येववेचि रघुनाथा ।
चोरुन पळालासी सीता । वृथा पुरुषार्था जल्पसी ॥७१॥
जेणे तुज बैसवूनि कांखेतळीं । केली सप्तसमुद्रीं आंघोळी ।
तो श्रीरामे मारोनि वाळी । तुज सहकुळीं वधूं आला ॥७२॥
जया विराधाभेण । सर्वदा पळे रावण ।
तो श्रीरामे मारोनि जाण । राक्षसकंदन करु आला ॥७३॥
स्वयंवरी नुचलेचि कोदंड । ते श्रीरामे केले दुखंड ।
तयाहीपुढे बळबंड । वृथा तू लंड वल्गसी ॥७४॥
ज्यासी समुद्र आला शरण । जेणे समुद्री तारिले पाषाण ।
त्या श्रीरामा माणुसपण । मूर्ख रावण तू म्हणसी ॥७५॥

रे रे रावण हीन दीन कुमते रामोऽपि कि मानुषः
कि गंगापि नदी गजः सुरगजो उच्चैश्रवाः कि हयः।
किं रंभाप्यबला कृतं किमु युगं कामोपि धन्वी नु किं
त्रैलोक्यप्रभवप्रतापविभवः किं रे हनूमान्कपिः ॥२॥

रामाचे महत्व न कळल्याबद्दल रावणाचा धिक्कार :

ऐके रावणा कुमती । दुष्टबुद्धि तू दुर्मती ।
चैतन्यविग्रही श्रीराममूर्तीं । मनुष्य त्याप्रतीं तू म्हणसी ॥७६॥
रामनामे मनुष्य तरती । मनुष्य मानिसी त्या रघुपती ।
रावण तुज अति दुर्मती । द्वेषानुवृत्तीं मरसील ॥७७॥
इतर ओहळांसमान । मानूं नये गंगाजीवन ।
जिचे जळीं करिता स्नान । परम पावन जड जीव ॥७८॥
समुद्रमंथनींचा ऐरावती । मानूं नये रानवट हस्ती ।
उच्चैःश्रवा अश्वजाती । पशु अश्वस्थितीं मानू नये ॥७९॥
कर्पूर कर्दळीजन्मस्थान । रंभा युवती स्वर्गभूषण ।
ते जड मूढ स्त्रियांसमान । सर्वथा जाण नव्हे ॥८०॥
कृतयुगाचें महिमान । सत्यवादी सात्विक जन ।
इतर युगेंसीं समान । ते युग जाण नये मानू ॥८१॥
अंगी नुमटतां वण । स्त्रीपुरुषां भेदी पंचबाण ।
तो स्थूळ धनुर्धरांसमान । सर्वथा जाण नये मानू ॥८२॥
समुद्राचे उल्लंघन । राक्षसकंदन लंकादहन ।
ऐसा हनुमंताचा प्रताप पूर्ण । त्रैलोक्यी जाण स्वये वंद्य ॥८३॥
ऐसा हनुमंत कपींद्र । ज्यासी आत्मत्वें मानी श्रीरामचंद्र ।
त्यासी तू म्हणसी वानर । तू दशशिर महामूर्ख ॥८४॥
गंगा नव्हे नदीपडिपाडें । ऐरावता हस्तित्व न घडे ।
उच्चैःश्रवा नव्हे घोडें । कृतयुगा न घडे इतर युगत्व ॥८५॥
रंभा नव्हे इतर नारी । हनुमान नव्हे तनुवानरी ।
राम परब्रह्म अवतारी । मनष्यदेहधारी तो नव्हे ॥८६॥
राम नव्हे मानुषवेख । राम त्रैलोक्यी तारक ।
राम परमात्मा चोख । राम निष्टंक परब्रह्म ॥८७॥
मरमर रे लंकानाथा । मनुष्य मानिसी रघुनाथा ।
बळे कुंथतोसि आता । तुझे बळ वृथा ते ऐक ॥८८॥
शंभूसहित स्वये गौरी । आंदोळिला कैलासगिरी ।
म्हणसी त्या बळाची थोरी । तृणावारी सरेना ॥८९॥

रे रे रावण शंभुशैलमथने प्रख्यातवीर्य
कथं रामेण प्रतियोद्धुमिच्छसि मुधा चेत्तत्र युक्तं तव ।
रामस्तिष्ठतु लक्ष्मणेन धनुषा रेखा कृताऽलंघिता
तच्चारेण च लंघितो जलनिधिर्दग्धा हतोक्षः पुरी ॥३॥

रावणाची अंगदाकडून निर्भर्त्सना :

कैलास आंदोळणाचें बळ । सीता चोरितांचि तत्काळ ।
तुझे तुज जाले निर्फळ । तू निर्बळ नपुंसक ॥९०॥
म्हणसी श्रीरामी करीन युद्ध । अनुक्त वचन बोल अबद्ध् ।
श्रीरामाभेणें पळसी निर्बंध । त्यासी युद्धा ते केवी मिळसी ॥९१॥
तुज नाही आंगवण । श्रीरामासी न करावे रण ।
लक्ष्मणरेखेपुढें जाण । काळे वदन तुझे जाले ॥९२॥
लक्ष्मणाची धनुष्यरेखा । नुल्लंघवेचि दशमुखा ।
तू सदाचि काळमुखा । वृथा आवाकां बळदर्प ॥९३॥
तुज नुल्लंघवे धनुष्यरेखा । श्रीरामसेवकाचा आवांका ।
समुद्र लंघोनियां देखा । येवोनि लंका विध्वंसी ॥९४॥
वनकर किंकर प्रधान पुत्र । जंबुमाळी अखया कुमर ।
मारोनियां निशाचर । लंकापूर जाळिलें ॥९५॥
तुम्हांमाजी इंद्रजित अदट । त्याचे हनुम्यानें काठिले चरपट ।
पळावया पुढे न फुते वाट । विवरी स्पष्ट लपाला ॥९६॥
श्रीरामाचा निजसेवक । हनुमान एकला एक ।
तेणे मर्दूनि तुझे कटक । तुझे दशमुख जाळिलें ॥९७॥
हनुम्यानें जाळिलें तुझ्या तोंडा । सभेसीं बैसलासी काळतोंडा ।
वृथा बोलसी बळवंडा । ऐक लंडा निजहित ॥९८॥
सीता अर्पूनि आपण । श्रीरामासी रिघाल्या शरण ।
तैच तुझे वांचती प्राण । येरवी मरण कुळेंसीं ॥९९॥
श्रीरामा सीता न देता जाण । रावणा तुज राखेल कोण ।
मीच तुझा घेईन प्राण । आंगवण पाहे माझी ॥१००॥

अंगदाचा अविष्कार आणि रावणाची तारांबळ :

रावण तुझी दहाही शिरें । मी छेदितों नखाग्रं ।
परी ती शिवनिर्माल्य अपवित्रें । म्हणोनि करे ना स्पर्शे ॥१॥
शिरें वाहून विश्वनाथा । परतोनि वाहिली माथा ।
पूर्ण पापी तू लंकानाथा । तुज मारिता दोष नाही ॥२॥
स्मरोनियां श्रीरघुनाथा । पाप न बाधी तुज मारिता ।
दहाहि शिरी हाणोनि लाता । रणी आता पाडीन ॥३॥
दशमुखासंमुख । अंगद आला निःशंक ।
रावणा तू रंक मशक । मारिता देख कोण राखे ॥४॥
अतिशयेंसिं निगरघट । अंगी आदळला मर्कट ।
तेणे बजबजिला दशकंठ । करील शेवट वानर ॥५॥

ततः सरोषमापन्नः शशास सचिवांस्तदा ।
गृह्यतामिति दुर्मेधा वध्यतामिति चासकृत् ॥४॥
रावणस्य वचः श्रुत्वा दीप्तग्निमिव तेजसा ।
आललंबुस्ततो घोराश्चत्वारो रजनीचराः ॥५॥
ग्राहयामास तारेयः स्वयमात्मानमात्मवान् ।
बलं दर्शयितुं वीरो निशाचरगणे तदा ॥६॥
स तान्बाहुद्वयासक्तानादाय पतगनिव ॥७॥

अंगदाच्या माराने रावण गडबडला :

अंगद आदळला अंगासीं । बोलिला निष्ठुर वाक्यासी ।
तेणे रावण कासाविसी । अति कोपेंसी कोपला ॥६॥
रावणासीं विविध बाध । स्वयेंचि भय स्वयेंचि क्रोध ।
धरा म्हणावया अंगद । सहसा शब्द न बोलवे ॥७॥
वांचवावया आपणासी । आक्रोशे सांगे प्रधानांसी ।
धरा मारा रे वानरासी । मज सभेसीं निर्भत्सीं ॥८॥
न धरिता भीडचाड । सभेमध्यें हा माकड ।
माझे म्हणे काळे तोंड । खंडविखंड करा यासी ॥९॥
माझे अपवाद असंख्यांत । हा बोलिला सभेआंत ।
अवश्य याचा करावा घात । तुम्ही समस्त मोळोनी ॥११०॥

अंगदाला पकडण्याचा सेनानींचा प्रयत्‍न :

ऐकोनि रावणाचे वचन । अंगद धरावया जाण ।
सैन्य सेनानी प्रान । अति गर्जोन धांवती ॥११॥
अंगद विचारी मानसी । मारु नये रावणासीं ।
अलोट रावणाच्या बळासीं । आणि सैन्यसी शक्ति किती ॥१२॥
यालागी अंगदे आपण । थोडेंचि केले उड्डाण ।
त्यासी धरावया सकळ सैन्य । अति सत्राण धाविन्नलें ॥१३॥
गदा मुद्‌गल परिघ पाषाण । शिळा शिखरें विंधिती बाण ।
अंगदासी धरावया पूर्ण । रक्षोगण धाविन्नले ॥१४॥
धरी मारीं पाडीं पाडीं । करीत आले राक्षसकोडी ।
अंगदा न बाधी भयसांकडी । लव वांकडी नव्हेचि ॥१५॥
लांब सोडिली पुसाटी । तेथे झोंबल्या राक्षसकोटी ।
एक झोंबलें चरणासन्निष्ठीं । एकी तो कंठी कवळिला ॥१६॥
पक्षी उडोनि आकाशी । झडपोनि धरिती वृक्षासी ।
तेंवी चौघे वीर पक्षाभिवेषीं । अंगदासीं झोंबले ॥१७॥
चौघांही वीरां बळ बहू । अंगद धरिला दोही बाहू ।
रामस्मरणे निःसंदेहू । नाही संदेहू अंगदा ॥१८॥
जेंवी का गुळावरी माशी । तेंवी अंगद राक्षसी ।
वेढिला तो चौपासी । तरी अंगदासीं नाही शंका ॥१९॥

प्रासादं शैलसंकाशमुत्पपातांगदस्तदा ।
तेंऽतरिक्षाद्विनिर्धूतास्तस्य वेगेन राक्षसाः ॥८॥
भूमौ निपातिताः सर्वें राक्षसेंद्रस्य पश्यतः ।
भंवत्वा प्रासादशिखरं नाम विश्राव्य चात्मनः ॥९॥
आस्फोटयामास तदा विनद्यं चक्रमे पुनः ।
वायुवेगं समालंब्य रावणस्य तदांगदः ॥१०॥
जग्राह मुकुटं चीरं पादप्रास्थाय मस्तके ।
अंगदेन पदाक्रांतो रक्षः संसदि रावणः ॥११॥
रावणस्तु परं चक्रे क्रोधं प्रासादघर्षणात् ।
विनाशं चात्मनो पश्यन्निःश्वासपरमोऽभवत् ॥१२॥

अंगदाच्या पराक्रमाचे वर्णनः

कटिपुष्ठीं बाहुमूळी । अंगद धरिला राक्षसी सकळीं ।
तेणेंसी तो आतुर्बळी । स्वये तत्काळी उडाला ॥१२०॥
लंकेसी शिखरासमान । रावणाचे निजभवन ।
अंगदाचे निज‍उड्डाण । सवेग जाण तेथे आले ॥२१॥
तेथोनिया पाहता तळी । भूमिका दिसताहे जवळी ।
म्हणोनि अंगद बळिया बळी । वेगे निराळीं उडाला ॥२२॥
अंग झाडितां आतुर्बळी । राक्षसी धरिला होता बळी ।
अंगवातें पडोनि तळी । जाली रांगोळी अवघ्यांची ॥२३॥
पाणी न मागतां देख । निमाले एक एक ।
महावीरी घेतला धाक । त्यासंमुख न ये कोणी ॥२४॥
तेथोनि अंगदाचे उड्डाण । सवेग येतांचि सत्राण ।
तळी पाडोनि रावण । मस्तकी चरण दिधला ॥२५॥
अंगदे हाणितांचि लाथा । रावण पडिला पालथा ।
त्यासी होता पै उलथा । बळ सर्वथा राहेना ॥२६॥
रावण घालोनि पायांतळी । अंगद गर्जे महाबळीं ।
धुर सोडवावया ये काळी । राक्षस कुळीं कोण आहे ॥२७॥
इंद्रजित अथवा कुंभकर्ण । सैन्य सेनानी प्रधान ।
सोडवावया स्वये रावण । आंगवण नव्हे कोणा ॥२८॥
कुंभकर्ण निद्राग्रस्त । वानरभयें इंद्रजित ।
स्वये चळचळां कांपत । भयें आकांत प्रधानां ॥२९॥

अंगदाचे राक्षसांना आव्हान :

राक्षसांचे सभेआंत । लिडाविला लंकानाथ ।
अंगद अतिशये गर्जत । नव्हे पुरुषार्थ राक्षसा ॥१३०॥
नामविख्यात वाळिसुत । अरे मी अंगद श्रीरामदूत ।
दमावया राक्षसपुरुषार्थ । लंकेआंत आलो असे ॥३१॥
कोणा अंगी असेल बळ । कोणी करु शकेल सळ ।
तेणे येवोनि तत्काळ । राणकल्लोळ करावा ॥३२॥
माझ्या पायांतळी दशानन । अडकलासे संपूर्ण ।
ज्यासी असेल आंगवण । तेणे सोडवण करु यावे ॥३३॥
सभामंडपीं अति आवेशी । अंगद पाचारी युद्धासीं ।
कोणी न ये सोडवणेसी । घेतला राक्षसी अति त्रास ॥३४॥
विध्वंसावें लंकाभुवन । ते शरणागता दिधले दान ।
तेणे क्षोभेल रघुनंदन । ऐसे आपण नये करु ॥३५॥
दान दिधले शरणागता । ते म्या लंका मोडितां ।
क्षोभ वाटेल रघुनाथा । यालागी स्वस्थता राखिली ॥३६॥
स्वये मारुं नये रावण । अंगदे जाणोनि आपण ।
पायी दडपोन दशानन । मुकुट होरोन घेतला ॥३७॥
मुकुट घेवोनि आपण । अंगद उडतां सत्राण ।
मस्तकें मंडप उचलिला पूर्ण । नाही ज्ञान अंगदा ॥३८॥
धन्य अंगदाचा साटोप । ऐशींसहस्रस्तंभी मंडप ।
उपडितां न कळेचि अल्प । परम प्रताप कपीचा ॥३९॥
ख्याति करोनि उद्‌भट । शिरी मंडप हाती मुकुट ।
अंगद आला वीरवरिष्ठ । देखिला स्पष्ट वानरी ॥१४०॥
मागे लंकेमाजी जाण । कळकळिती राक्षसगण ।
नेलें सभेचे मंडण । भाग्ये रावण वांचला ॥४१॥
अंगद वीर उद्‌भट । रावणा घोळसोनि स्पष्ट ।
हिरोनि घेतला मुकुट । माग्यें दशकंठ वांचला ॥४२॥
अंगदापासून रावणे भाग्ये सुटल्या जीवे प्राणें ।
आजि करा याचे जिताणें । वर्धापन जीविताचें ॥४३॥
रावण सांगे स्वभावतां । अंगदे हाणितांचि लाथा ।
प्राण जावा पै तत्वता । सभाग्यतां वांचलो ॥४४॥
म्हणो पुरुषार्थी हनुमंत । त्याहून अंगद विख्यात ।
देखोनि वानाराचा पुरुषार्थ । साशंकित रावण ॥४५॥
मंडप अंगदाचे शिरी । रत्‍नकळसांचिया हारी ।
मुक्ताफळांच्या झल्लरी । पताका वरी विचित्र ॥४६॥
वानर् सांगती उल्लासतां । सगळी लंका घेवोनि माथा ।
अंगद आला ऊर्ध्वपंथा । पाहे पुरुषार्था श्रीरामा ॥४७॥

अंगदाच्या कृतीने रामास क्रोध, अंगद मंडप पुनर्स्थापित करतो :

मंडप देखोनिया माथा । कोप आला श्रीरघुनाथा ।
अंगदे केली अधर्मता । तुझ्या घाता मी करीन ॥४८॥
लंका दिधली शरणागता । तेथींचा अर्थ येणे आणितां ।
मज लागेल अधमता । तुज या अर्था दंडीन ॥४९॥
अंगद म्हणे ऐके रघुनाथा । निजबळे मज उडता ।
केव्हा मंडप बैसला माथा । नकळता मज येथे आला ॥१५०॥
मस्तकबळें उपडोन । मंडपाचें येथे आगमन ।
सर्वथा मज नाही ज्ञान । तुझी आण श्रीरामा ॥५१॥
ऐकोनि अंगदाची आण । श्रीराम झाला सुप्रसन्न ।
अंगदे करोनि रामस्मरण केले विंदान ते ऐका ॥५२॥
पुढील येते जे उड्डाण । ते करोनि उलटें किराण ।
लक्षोनिया सभास्थान । मंडप संपूर्ण सांडिला ॥५३॥
बाप अंगद विंदानी । उथाळीं बैसलीं स्तंभस्थानीं ।
समूळ सूत्र चुकों नेदूनी । ठेविला स्वस्थानीं मंडप ॥५४॥
मंडप येता कडकडाट । राक्षसा होय हृदयस्फोट ।
आक्रंदला दशकंठ । आले अरिष्ट अनिवार ॥५५॥
अंगद मंडप गेला घेवोनी । श्रीरामे सोडविला परतोनी ।
रावणे ऐकतांचि कानिं । धाके मनी भयभीत ॥५६॥
अंगद म्हणे दशानना । रामे मंडप धाडिला जाणा ।
लंका दिधली बिभीषणा । रणी रावणा मारुनी ॥५७॥
ऐसे सांगोनि लंकानाथा । अंगद परतला तत्वता ।
भेटावया श्रीरघुनाथा । उल्हासता स्वानंदे ॥५८॥

अंगदःपुनरागत्य ववंदे चरणौ ततः ।
सुग्रीवस्य च रामस्य लक्ष्मणस्य तथैव च ॥१३॥
अन्योन्यं ते महावीरा अभिवाद्य महाबलाः ।
रक्षोराजस्य मुकुटं राघवाय न्यवेदयत् ॥१४॥
तंदृष्टवा मुकुटं रामो रत्‍नसारविभूषितम् ।
आबबंध महाबाहू रावणानुजमस्तके ॥१५॥

अंगदाचे रावणाच्या मुकुटासह पुनरागमन :

लंकेसी मंडप सांडून । अंगदे करोनिया उड्डाण ।
सवेग येवोनि आपण । श्रीरामचरण वंदिले ॥५९॥
वंदोनि सौ‍मित्र चरण । सुग्रीवासी अभिवंदन ।
वंदोनिया बिभीषण । लोटांगण हनुमंता ॥१६०॥
आणिकही वानरवीर । नळनीळजांबुवंतादि थोर ।
अवघे वंदोनि वानर । केला भुभुःकार रामनामे ॥६१॥
सवेचि अंगद महावीर । येवोनि श्रीरामा समोर ।
पुरुषार्थाचे निजसार । केले चरित्र ते दावी ॥६२॥
अनर्घ्य रत्‍न अति तेजिष्ठ । रावणाचा महामुकुट ।
श्रीरामापुढें ठेवोनि स्पष्ट । पाया मर्कट लागला ॥६३॥
तुझिया कृपा श्रीराघुनाथा । लंकेसी जावोनि तत्वता ।
रावणापासी सांगता सीता । अति अहंर्तां अनुवादे ॥६४॥
तेथे म्या केल्या तीव्र गोष्टी । जेणे रावण कपाळ पिटी ।
तरी तो राक्षस महाहट्टी । सीता गोरटी सोडीना ॥६५॥
तुम्हांसी मागता कोरान्न । मी तंव सीता नेदीं चिद्रत्‍न ।
ऐसे बोलता दशानन । कोप दारुण मज आला ॥६६॥
रावण ऐसा अति बळिष्ठ । घाये ढिलाविला सुभट ।
पाये चेपून दशकंठ । शिरीचा मुकुट हरियेला ॥६७॥
राक्षसांच्या वीरश्रेणी । धाविन्नल्या माझ्या ग्रहणी ।
त्या म्या आपटितां अवनी । रुधिरे धरणी प्रवाहे ॥६८॥
रावण गांजिलियापाठीं । राक्षस निघाले दिग्पटी ।
तिही सांडिल्या युद्धगोष्टी । संमुख दृष्टी कोणी नये ॥६९॥
तेथूनि मज सवेग येता । मंडप आला न कळतां ।
तो म्या सांडिला मागुता । सत्य रघुनाथा हे गोष्टी ॥१७०॥
ऐकोनि अंगदाच्या गोष्टी । मुकुट देखोनिया दृष्टी ।
श्रीराम सुखावला पोटी । स्वानंदपुष्टीं आलिंगी ॥७१॥

आनंदशौर्याचा गौरव :

धन्य अंगदाचा पुरुषार्थ । रणी गांजोनि लंकानाथ ।
मुकुट घेवोनि आला व्यक्त । अति विस्मित श्रीराम ॥७२॥
संतोषोनि रघुनंदन । हृदयी आलिंगी सुप्रसन्न ।
करी अंगदमुखचुंबन । अंगद धन्य श्रीरामे ॥७३॥
श्रीरामे मुकुट घेवोन । पाचारोनि बिभीषण ।
त्याचे मस्तकी आपण । सतोषोन स्वये घाली ॥७४॥
बिभीषण जाला राज्यधर । वानरी केला जयजयकार ।
रामनामे गर्जें अंबर । देती भुभुःकार स्वानंदे ॥७५॥
मुकुट बिभीषणाचे मौळीं । देखोनि वानरी सखळीं ।
हरिखें पिटोनिया टाळी । सुखकल्लोळीं नाचती ॥७६॥
नळ नीळ जांबवंत । सुग्रीव सुषेण हनुमंत ।
अंगदाचा पुरुषार्थ । वानर वानीत आल्हादे ॥७७॥
अंगद वीर अति उद्‌भट । अंगद वीर भट सुभट ।
तेणे गाजोनि दशकंठ । आणिला मुकुट पत्यक्ष ॥७८॥
ऐसी अंगदाची वाटिव । वानर वानिताती सर्व ।
अंगदमानसीं श्रीराघव । भाग्ये अभिनव अंगद ॥७९॥
शिष्टायी न मानीच रावण । तेणे क्षोभला रघुनंदन ।
आता करील रणकंदन । दुर्धर बाण सोडूनी ॥१८०॥
वानर निशाचर रणी । भिडती झोंटधरणीं ।
अशुद्धे पूर वाहेल धरणी । आयणीपायणी भिडतील ॥८१॥
एका जनार्दना शरण । अंगदशिष्टाई जाली पूर्ण ।
पुढे गोड निरुपण । रम्य रामायण श्रीरामे ॥१८२॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने युद्धकांडे एकाकारटीकायां
अंगदशिष्टाई निरुपणं नाम अष्टमोऽध्यायः ॥८॥
ओंव्या ॥१८२॥ श्लोक ॥१५॥ एवं १९७ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग