वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४२. मातलीचे आगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088120 · अभंग क्र. ४२

42.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय बेचाळिसावा ॥
रावणाच्या रथाचा भंग

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

इंद्रजित वधाने रावणाचा क्रोध :

इंद्रजिताचा करोनि घात । सौ‍मित्र विजयान्वित ।
ते ऐकोनि लंकानाथ । दुःखाभिभूत अति दुःखी ॥१॥
निकुंबळे विवराआंत । लक्ष्मणे जावोनि तेथ ।
केला इंद्रजिताचा घात । प्रधान सांगत लंकेशा ॥२॥
लक्ष्मणा साह्य हनुमंत । प्रतापे रिघोनि विवरांत ।
बाहेर काढिता इंद्रजित । मेघपृष्ठपर्यत वाढला ॥३॥
इंद्रजित मेघपृष्ठीं गर्जत । लक्ष्मण नेवोनि स्वहस्तें तेथ ।
मेघनादाचा केला घात । साह्य हनुमंत सर्वार्थी ॥४॥
ऐकोनि इंद्रजिताचा घात । अरावण महामोहान्वित ।
सिंहासनातळीं मूर्च्छित । पडे अकस्मात विसंज्ञ ॥५॥
संज्ञा पावोनिया रावण । दहाही मुखी करी शंखस्फुरण ।
दीर्घस्वरे करी रुदन । पुत्रनिधान अंतरले ॥६॥
दुःखे गडबडा लोळे । केश सुटले मोकळे ।
अश्रुधारा स्रवती डोळे । लाळ गळे दशमुखी ॥७॥
पुत्रशोकें अति संतप्त । नेत्रद्वारा अश्रु स्रवत ।
क्रोधे गरगरा नेत्र भ्रमत । अवघे पळत अति धाके ॥८॥
जिकडे जिकडे दृष्टि जाये । तिकडे आगी लागों पाहे ।
कोपे थरथरा कांपताहे । करावे काय स्मरेना ॥९॥
सवेंचि म्हणे इंद्रजिता । तुझ गेलिया रे आता ।
मज नाही कोणी रक्षिता । दुःखावस्था विलपत ॥१०॥
शंखस्फुरणें फुटले ओंठ । रडतां सोकले दहाही कंठ ।
पुत्रशोकाचें यथेष्ट । दुःख अचाट रावणा ॥११॥
मग बोलिला गर्जोन । इंद्रजिताच सूड घेईन ।
रणी मारीन रामलक्ष्मण । आंगवण पहा माझी ॥१२॥
माझे मारिले थोर थोर । निधडे योद्धे महावीर ।
सखे बंधु लाडके कुमर । तेंचि दशशिर अनुवादे ॥१३॥

महापार्श्वे विनिहते राक्षसे च महोचरे ।
निशाचरे महामात्ये विरुपाक्षे निपातिते ॥१॥
विश्रुतेषु च योथेषु कांदिग्भूतेषु सर्वशः ।
रावणः शोकसंतप्तः कार्यशेषमचिंतयत् ॥२॥
चिंतायित्वा नातिचिरं स्वसैन्यानि निवर्त्य च ।
सुतं संचोदयामास वाक्यं चेदमुवाच ह ॥३॥
निहतानाममात्यानां रुद्धस्य नगरस्य च ।
दुःखमेवापनेष्यामि हत्वा तौ रामलक्ष्मणौ ॥४॥

दुःखे वदे दशकंठ । माझे मारिले भट सुभट ।
बंधु मारिले अति बळिष्ठ । ज्येष्ठ कनिष्ठ निजकुमर ॥१४॥
किती सोसूं दुःख दारुण । म्हणाल मारिले कोण कोण ।
ते मी सांगेन अवघे जाण । रणप्रवीण महायोद्धे ॥१५॥
महापार्श्व महोदर जाण । निधडा मारिला कुंभकर्ण ।
प्रहस्त मारिला प्रधान । अकंपन महावीर ॥१६॥
वज्रदंष्ट्र विरुपाक्ष । कुंभ निकुंभ धूम्राक्ष ।
अतिकाय त्रिशिरा मकराक्ष । वीर असंख्य मारिले ॥१७॥
देवांतका नरांतका निःपात । ज्येष्ठ मारिला इंद्रजित ।
तेणे होऊं पाहे प्राणांत । लंकानाथ तळमळी ॥१८॥
पुच्छ तुटल्या सापसुरळी । जळावेगळी मासोळी ।
तैसा रावण तळमळी । राक्षसकुळी निर्दाळितां ॥१९॥
रणी मारिले नेणो किती । उरली जे सैन्यसंपत्ती ।
धाके पळाली दश दिशांप्रती । लंकापति अति दुःखी ॥२०॥
मिळोनिया रामलक्ष्मण । माझ्या सुहृदां केले कंदन ।
त्या दोघांचा घेईन प्राण । गर्जें रावण आक्रोक्षे ॥२१॥
सांडून सैन्याची आस । घालोनि संग्रामाची कांस ।
पाचारोनि सारथ्यास । सांगे लंकेश ते ऐका ॥२२॥
मिळोनिया वानर नर । सुहृद मारिले समग्र ।
माझे रोधिलें असे नगर । निशाचर गांजोनी ॥२३॥
त्या दोघांचा करावया अंत । स्वये जातो संग्रामांत ।
शीघ्र सज्जोनि आणीं रथ । लंकानाथ अनुवादे ॥२४॥

कर्मणोस्य हि तौ मूलं भ्रातरौ राघवावुभौ ।
ययोः प्रशाखाः सुग्रीवो हरयोऽन्ये च यूथपाः ॥५॥
फलपुष्पे जनकजा शिला धृष्टश्च मारुतिः ।
मूले हते हतं सर्वं तौ हनिष्यामि संयुगे ॥६॥

संग्रामवृक्षाचें मूळ जाण । मुख्य श्रीरामलक्ष्मण ।
सबळ दिंड तो सुग्रीव जाण । खांद्या संपूर्ण कपिमुख्य ॥२५॥
योद्धे वानर शाखा सरळ । जनकजा ते पुष्पफळ ।
संग्राम वाढवी ते शीळ । जाण केवळ हनुमंता ॥२६॥
लाहोनी हनुमंताचे बळ । संग्रामाचें बळशीळ ।
माझे निर्दळावया कुळ । द्वंद्वी केवळ हनुमंत ॥२७॥
रामलक्ष्मणादि समस्त । उणें पडत जेथ जेथ ।
हनुमान साह्य होय तेथ । अटक कार्यार्थ साधुनी ॥२८॥
आता मी जावोनि आपण । रणी मारीन रामलक्ष्मण ।
मूळ छेदिलिया जाण । अवघे जण निमतील ॥२९॥
राम सौ‍मित्र निमाल्या पाठी । हनुमान मरेल उठाउठी ।
निमतील वानरांच्या कोटी । निर्वैर सृष्टी करीन ॥३०॥
ऐसे बोलोनी रावण । रथी बैसला आपण ।
अति क्रोधे क्रोधायमान । गडगर्जन करीतचि ॥३१॥

स दिशो दश घोषेण रथेन सहसा भृशम् ।
नादयन्‍राक्षसश्रेष्ठो राघवावभ्यवर्तत ॥७॥
स विस्फार्य महाचापं किरीटामृष्टकुंडलः ।
नाम संश्रावयामास जगर्ज च ननाद च ॥८॥
ते राक्षसेंद्र तं दृष्ट्वा वानरस्त्रस्तचेतस ।
शरणं शरणं जग्मुर्मनसा पुरुषोत्तम् ॥९॥
ततस्तं राघवो दृष्ट्वा रथस्थं पर्वतोपमम् ।
विधुन्वानं धनुर्घोरं व्यायतास्यमिवांतकम् ॥१०॥

रावणाचे रणांगणावर प्रयाण :

घडघडाट रथस्पंदें । दश दिशा कोंदल्या नादे ।
मी रावण येणे शब्दे । गर्जत ब्रीदे स्वये आला ॥३२॥
मुकुट कुंडले मेखळा । अंगदे कंकणें कंठमाळा ।
चाप सज्जोनि प्रबळाबळा । रथी बैसला गडगर्जे ॥३३॥
ध्वज पताका छत्र चामर । कवची खड्गी धनुर्धर ।
संमुख लक्षोनि रामचंद्र । दशशिर् चालिला ॥३४॥
वानरसेनांचिया थाटी । बाणी त्रासिल्या कोट्यनुकोटी ।
कपि पळोनि उठाउठी । रिघालें पाठी श्रीरामाच्या ॥३५॥
वानर धाकत धापत । भेणे चळाचळा कांपत ।
अभय देवोनि रघुनाथ । पुढे लंकानाथ देखिला ॥३६॥
पाचारोनि बिभीषण । स्वये पुसे रघुनंदन ।
माझे त्रासित वानरगण । येता कोण तो सांग ॥३७॥

आचक्षे महातेजा राघवाय बिभीषणः ।
दशग्रीवो महातेजा राजा वैश्रवणानुजः ॥११॥
भीमकर्मा महोत्साहो रावणो राक्षसाधिपः॥१२॥

माझे त्रासित वानर । कवची खड्गी धनुर्धर ।
कोण येतो निशाचर । सांग सत्वर बिभीषणा ॥३८॥
ऐसे पुसतां रघुनंदन । स्वये सांगे बिभीषण ।
अति दुर्धर हा दशानन । राजा जाण लंकेचा ॥३९॥
इंद्रजिताचा झाला घात । पुत्रशोकें अति संतप्त ।
युद्धा आला लंकानाथ । करित प्राणांत वानरा ॥४०॥
करावया निर्वाणरण । युद्धा आलासे रावण ।
त्यांचे करावया निर्दळण । सज्जीं बाण श्रीरामा ॥४१॥
ऐकोनि बिभीषणवचन । संतोषला रघुनंदन ।
निर्दळावया दशानन । धनुष्यबाण सज्जिलें ॥४२॥
संमुख लक्षोनि रावण । धनुष्यी सज्जोनिया बाण ।
काय बोलिला रघुनंदन । सावधान अवधारा ॥४३॥
विंधोनिया दृढ बाण । घाये मारीन रावण ।
अभिषिंचीन बिभीषण । रणा संपूर्ण समाप्ती ॥४४॥
माझी दृष्टि पडलिया जाण । लंकेशाचे न वांचती प्राण ।
रणी मारीन रावण । प्रतिज्ञा पूर्ण माझी ॥४५॥
आजचि रणसमाप्ती । रामराज्य त्रिजगती ।
करावया रघुपती । बाण शितीं सज्जिला ॥४६॥
बाण ओढोनि कानाडी । विंधित अति कडाडीं ।
रावण येत येता तोडी । रणनिर्वडी साधूनी ॥४७॥

लक्ष्मण रावणाला सामोरा येतो :

बाण विंधिता रघुवीर । ती बाणी छेदी दशशिर ।
तेणे क्षोभला सौ‍मित्र । चाप सत्वर सज्जिले ॥४८॥
सौ‍मित्राचा चापशब्द । तेणे रावण झाला स्तब्ध ।
सैन्य सेनानी जाले मंद । भय सुबद्ध राक्षसा ॥४९॥
सौ‍मित्रे विंधिता शर । दणाणिला दशशिर ।
हदादले निशाचर । राक्षसभार खवळला ॥५०॥
लागता सौ‍मित्राचे बाण । रणी क्षोभला रावण ।
संमुख देखोनि लक्ष्मण । काय आपण जल्पत ॥५१॥
घेतला इंद्रजिताचा प्राण । तू तंव माझा द्वंद्वी पूर्ण ।
विंधोनियां निर्वाणबाण । तुज धाडीन यमलोका ॥५२॥
मारावया सौ‍मित्रा । रागे कांपत थरथरा ।
नेत्र भवंडी तो गरगरा । दांत करकरा खातसें ॥५३॥
त्यासी सौ‍मित्र म्हणत । बडबडसी का खासी दांत ।
करुनि दाखवीं पुरुषार्थ । तू लंकानाथ प्रतापी ॥५४॥
बडबड करावया जाण । बहु तोंडीं तोंडाळ दशानन ।
काही न दिसे आंगवण । रणी रावण तू नपुंसक ॥५५॥
माझे सुटलिया बाण । ससैन्य मारीन रावण ।
ऐसे बोलता लक्ष्मण । दशानन खवळला ॥५६॥

संत्रस्यद्वानरानीकं शरवर्षैर्महाभुजः ।
रामोऽपि राक्षसश्रेष्ठं शरैरग्न्यर्कसन्निभैः ॥१३॥
ततः प्रवर्तते युद्धं रामरावणयोर्महत् ।
जीवितांतकरं घोरं परस्परवघौषिणोः ॥१४॥

रावण लक्ष्मण युद्ध :

संमुख लक्षूनि लक्ष्मण । रावणे विंधिले दुर्धर बाण ।
एक एक त्रिधा भेदून । सांडी लक्ष्मण लघुहस्तें ॥५७॥
त्रिधा छेदिले बाण संपूर्ण । तेणे क्षोभला दशानन ।
लक्ष्मणावरी आपण । कोटी कोटी बाण वर्षला ॥५८॥
लक्ष्मण निवारी जंव बाण । तंव विंधिला बिभीषण ।
सुग्रीव विंधोनियां जाण । वानरगण त्रासिले ॥५९॥
अग्न्यर्कतेजस्वी बाण । क्रोधे घेवोनि रावण ।
दशग्रीव गर्जोन । रघुनंदन विंधिला ॥६०॥
येता रावणाचे बाण । रामे सांडिले छेदून ।
ते काळी अति निर्वाण । दोघांही रण मांडिलें ॥६१॥
दोघे वीर विचक्षण । येरयेरांचे घ्यावया प्राण ।
लघुलाघवे विंधिती बाण । हस्तविंदान दावूनी ॥६२॥

राघवो रावण संख्ये रावणश्चापि राघवम् ।
अन्योन्यं विशिखैस्तीक्ष्णैः शरैरभिववर्षतुः ॥१५॥
चेरतुश्चरितं चित्रं मंडले सव्यदक्षिणे॥१६॥

राम रावणाचे युद्ध :

राम उठावला रावणावरी । रावण उठावला रामावरी ।
युद्ध मांडले जीवावरी । परस्परीं झगटले ॥६३॥
विचित्र मंडळें विचरत । लघुलाघवे बाण विंधित ।
येरयेरांचा करावया घात । रणी उन्मत्त मातले ॥६४॥
रावण रणी रणोन्मत्त । श्रीराम रणी सावचित्त ।
दशशिराचा करावया घात । संधि पहात साटोपे ॥६५॥
श्रीरामाची निजगती । न पवे मनबुद्धि चित्तवृत्ती ।
रावण बापुडे ते किती । कैशा रीती पावेल ॥६६॥
पदाति राम रथी रावण । मंडळें करिता सव्यदक्षिण ।
रथेंसीं श्रमला दशानन । रघुनंदन नाटोपे ॥६७॥
रामरावणांचे शर । आच्छादिती दिनकर ।
रणी पडिती अंधकार । येरा येर न देखती ॥६८॥
श्रीरामहस्तींची मुद्रिका । तिचेनि तेजे पै देखा ।
श्रीरामा आणि दशमुखा । युद्धाचा आवांका संग्रामी ॥६९॥
परस्परें घ्यावया प्राण । संधी पाहती दोघे जण ।
दोघे संग्रामी विचक्षण । रणप्रवीण धनुर्वाडे ॥७०॥

उभौ च परमेष्वासावुभौ शस्त्रविशारदौ ।
उभौ शस्त्रभृतां श्रेष्ठावुभौ युद्धे न चेलतुः ॥१७॥
एकमेकेन बाणेन त्रिभिस्त्रीन्दशभिर्दश ।
व्यसृजच्छरवर्षाणि राघवो राक्षसेश्वरः ॥१८॥

दोघे धनुर्विद्यानिपुण । दोघे शस्त्रास्त्रप्रवीण।
शस्त्र प्रेरणनिवारण । दोघे जण जाणती ॥७१॥
एके छेदिती एक बाण । तीन बाणी तीन बाण ।
दाहीं छेदिती दहा बाण । दोघेजण लघुवेधी ॥७२॥
अदट दाटुगे वीर धीरें । चपळहस्तें बाणमारें ।
रणी न सरती माघारे । दोघे गजरें गर्जोनी ॥७३॥
ऐसियामध्यें राजा रावण । दुर्धर सज्जोनिया बाण ।
लक्षोनिया रघुनंदन । विधी आपण साटोपे ॥७४॥
त्याचे निवारोनी बाण । रामे विंधिले शर दारुण ।
रथेंसहित रावण । नेला उडवोन आकाशा ॥७५॥
बाणपिसारियाचा वारा । रथ भोंवे गरगरा ।
रावणे निवारोनियां शरा । रहंवरा थांबविले ॥७६॥
रामे विंधोनियां बाण । रणी उडविला दसानन ।
तेणे खवळला रावण । अस्त्र निर्वाण सोडिले ॥७७॥
रावण जपोनि संमत्र । अस्त्र प्रेरिलें आसुर ।
त्यापासून जीव क्रूर । अति दुर्धर चालिले ॥७८॥
वृक जंबुक सिंह व्याघ्र । काक कंक गीध घार ।
वडवा वरहा महाखर । सर्प विखार धुंधुवात ॥७९॥
नीळ नकुळ दंश कुक्कुट । क्रुर श्वापदांचें थाट ।
श्रीरामावरी अचाट । सोडी दशकंठ अस्त्रयोगें ॥८०॥
मारावया रामाराणा । रावण क्रोधे काळियां जाणा ।
सर्पप्राय विंधी बाणां । आंगवण साटोपे ॥८१॥
असुरास्त्र महाघोर । येता देखोनि अति क्रूर ।
अचुकसंधानी रामचंद्र । तेणे अग्निअस्त्र सज्जिलें ॥८२॥

आसुरेण समाविष्टः सोऽस्त्रेण युधि रावण ।
ससर्जास्त्रं महोत्साहः पावकं पावकोपमम् ॥१९॥
ते रावणशरा घोरा राघवास्त्रेण मोहिताः ।
विलयं जग्मुराकाशे विनिकृत्ताः सहस्रधा ॥२०॥

असुरास्त्र अति क्रूर । चालिले सिंह वृक व्याघ्र ।
रामे सोडून अग्निअस्त्र । केले समग्र भस्मांत ॥८३॥
अस्त्रे निवारोनि अस्त्र । निधडा योद्धा श्रीरामाचंद्र ।
ते देखोनि दशशिर । क्रोधे दुर्धर खवळला ॥८४॥

ततः संत्रस्तवक्त्रस्तु रावणो लोकरावणः ।
नाराचमालां रामस्य ललाटे प्रत्यमुंचत ॥२१॥
रौद्रचापप्रयुक्तां च नीलोत्पलमयीमिव ।
शिरसा धारयन्‍रामो न व्यथामध्यगच्छत ॥२२॥

माझे अस्त्र निजनिर्वाण । रामे सांडिलें छेदून ।
तेणे रावण अति दीन । म्लानवदन पै झाला ॥८५॥
असुरास्त्र केले वृथा । रणी मारीन रघुनाथा ।
पांच बाण विंधिले माथा । लघुलाघवता साटोपे ॥८६॥
येता रावणाचे बाण । राम न करी निवारण ।
पाहू पा याची आंगवण । दारुणपण बाणांचे ॥८७॥
कमळमाळा मनोहर । तैसे मस्तकी शोभती शर ।
व्यथा न पवे श्रीरामचंद्र । निधडा वीर संग्रामा ॥८८॥
पुष्पप्राय लागले बाण । तेणे लाजला रावण ।
जळो माझी आंगवण । रघुनंदन ढळेना ॥८९॥
निर्वाणबाणाचा आघात । उघडा अंगी श्रीरामा साहत ।
माझा न चले पुरुषार्थ । चिंताक्रांत रावण ॥९०॥
रावणाचे पांचही बाण । श्रीराममस्तकीं देखोन ।
सौ‍मित्र क्षोभला दारुण । धनुष्यबाण वाहिलें ॥९१॥

एतस्मिन्नंतरे क्रुद्धो राघवस्यानुजो बली ।
लक्ष्मणः सायकन्‍सप्त जग्राह परवीरहा ॥२३॥
तैः सायकैर्महायोगै रावणस्य महाद्युतेः ।
ध्वजं मनुष्यशीर्षं च तस्य चिच्छेद वीर्यवान् ॥२४॥
सारथेश्चैव बाणेन शिरो ज्वलितकुंडलम् ।
जहार लक्ष्मणः श्रीमान्नथादाशु पपात च ॥२५॥
कृष्यमाणं तु चिच्छेद धनुर्गजकरोपमम् ।
लक्ष्मणो राक्षसेंद्रस्य पंचभिः पंचपर्वभिः ॥२६॥
नीलमेघनिभांश्चास्य सदश्वान्पवनोपमान् ।
निजघान महावेगान्‍रावणस्य बिभीषणः ॥२७॥

लक्ष्मणाने रावणाचा रथ व सारथी मारिले :

धनुष्य वाहोनि लक्ष्मण । गुणीं लाविले सात बाण ।
क्रोधे लक्षोनि रावण । विधी आपण साटोपे ॥९२॥
लक्ष्मणबाणांच्या कडाडीं । रावणा पडली झांपडी ।
काढों विसरला तो वेढी । चेतना वेडी होवोनि ठेली ॥९३॥
ध्वज नरशिरसमयुक्त । ब्रीद मिरवी लंकानाथ ।
तो छेदोनियां त्वरित । संग्रामांत पाडिला ॥९४॥
दुसरा येतांचि शर । मुकुट कुंडले मनोहर ।
सारथ्याचें छेदोनि शिर । रणी सत्वर पाडिले ॥९५॥
छत्र पताका झल्लरी । मुक्ताफळांच्या माळा थोरी ।
छेदोनि पाडिल्या धरेवरी । बाणाग्री सौ‍मित्रे ॥९६॥
लघुलाघवे लक्ष्मण । सव्यापसव्य विंधोनि बाण ।
रावणाचे धनुष्यबाण । रणी छेदोन पाडिलें ॥९७॥
नीळमेघपडिपाडें । पवनवेगीं जोड्या जोडे ।
रावणरथाचे घोडे । मारिले रोकडे बिभीषणें ॥९८॥

बिभीषणाने रावणाचे घोडे मारिले :

बिभीषणे विंधोनि बाण । वारुवांचा घेतला प्राण ।
तेणे बंधुवरी रावण । काळरुपें पूर्ण क्षोभला ॥९९॥
जवळी असता लक्ष्मण । करु न शके आंगवण ।
कुसमुसूनि रावण । उगाच आपण राहिला ॥१००॥
निधडा शूर लक्ष्मण । रणी गांजोनिया रावण ।
विरथी करोनिया जाण । पायी संपूर्ण पळविला ॥१॥
विजयी झाला सौ‍मित्र । वानर करिती जयजयकार ।
रामनामाचा गज्र । नादें अंबर कोंदलें ॥२॥
एका जनार्दना शरण । युद्ध झाले अति निर्वाण ।
रावनें मारिता बिभीषण । ते शक्ति लक्ष्मण साहेल ॥३॥
पुढील प्रसंगी स्वभावता । शक्तिभेदाची येईल कथा ।
एका जनार्दनी सरता । अवधान श्रोतां मज द्यावे ॥४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रावणरथभंगापजयो नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥४२॥
ओव्या ॥१०४॥ श्रोक ॥२७॥ एवं १३१ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग