उपाधिवेगळे तुम्ही नि
2208.
उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । काहीच संसार तुम्हा नाही ॥१॥
ऐसे मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥धृपद॥
निस्संग तुम्हासी राहणे एकट । नाही कटकट साहो येक ॥२॥
तुका म्हणे नाही मिळो येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥३॥
अर्थ :
देवा तुम्ही उपाधी पेक्षा वेगळे निर्विकार आहात तुम्हाला जन्ममरण रुपी संसार हा मुळीच नाही. हे नारायणा मलाही अगदी तुमच्यासारखेच एकदम करा आणि माझी सर्व वासना मुळासहीत नष्ट करा. देवा तुम्हाला निसंग आणि एकटे राहण्यास आवडते कोणत्याही प्रकारची कटकट तुम्हाला सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही असे आहात जसा एखादा स्पटिक मणी सगळ्या रंगासी जुळता मिळता होतो परंतु तो सर्वांपेक्षा वेगळा असतो तसेच तुमचे आहे तुम्ही सर्व जगात वास्तव्य करता खरे पण तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आहात.
