तरि का मागे वाया कीर
2450.
तरि का मागे वाया कीर्ती वाढविली । जनांत आपुली ब्रिदावळी ॥१॥
साच करिता आता फिरसी माघारा । ठायीचे दातारा नेंणवेचि ॥धृपद॥
संतासी श्रीमुख कैसे दाखविसी । पुढे मात त्यासी सांगईन ॥२॥
घेईन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥३॥
तुका म्हणे आम्ही राहिलो मरोनि । तू का होसी धनी निमित्याचा ॥४॥
अर्थ :
अरे देवा तू आपली ब्रिदावळी म्हणजे तू भक्तवत्सल आहेस दीनानाथ आहेस पतितपावन आहेस अशी कीर्ती पूर्वी जन माणसांमध्ये वाढविली आणि तू तर इतका कठोर आहेस हे मला समजले आहे मग तू व्यर्थ तू आपली ब्रिदावळी का वाढविली आहेस? देवा एखाद्याला जर एखादी पदवी मिळालेली असेल तर त्या पद्धती प्रमाणे वागणे हे त्याचे कर्तव्य आहे मग हे सर्व तुला माहित असून देखील तू आपल्या ब्रिदापासून माघारी का फिरत आहेस? देवा मी तुझी सर्व माहिती आता संतांना सांगणार आहे मग मी पाहतोच तु आपले श्रीमुख मग संतांना कसे दाखवितो? मी आता तुझ्या नामाचा असा सर्वत्र डांगोरा पिटणार आहे की देव अनाथांचा नाथ नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा अहो आम्ही कसेही केले तरी मरणारच आहोत परंतु तुझी कृपा आमच्यावर झाली नाही म्हणूनच तुझा भक्त मेला असा तू ठपका स्वतःवर ओढवून घेण्याचा धनी विनाकारणच का होतोस?
