कान्हो एकली रे तुजसव
3804.
कान्हो एकली रे तुजसवे चुकले रे । भय वाटे जनी मज अबळा धाकली रे ॥१॥
निघता घरी आई बा वारी । तुजसवे का आलिये हरी ॥धृपद॥
लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलिये ॥२॥
पिकल्या बोरी झाले सामोरी । काय जाणा कोठे राहिला हरी ॥३॥
आड खुंट झालिया जाळी । काय जाणो कान्हे मांडिली रळी ॥४॥
तुका म्हणे जाऊ आलिया वाटा । पाहो हरी पायी न मोडे कांटा ॥५॥
अर्थ :
हे कान्होबा मी एकटी आहे तुझ्याबरोबर मी रानात आले हेच माझे चुकले. मला खूप भीती वाटत आहे मी अबला आहे त्यातल्या त्यात मी खूप लहान आहे. हे हरी घरातून निघल्याबरोबर माझ्या आईबापानी मला सांगितले की जाऊ नकोस तरी देखील मी तुझ्याबरोबर का आले असेल ? लोक मला सांगत होते की, कृष्णाच्या वाटेने जाऊ नकोस तो खोटा आहे त्याची संगती करु नकोस परंतू काय करावे मला तुझी चट लागलेली होती. ज्यावेळी माझ्यासमोर पिकलेल्या बोरी आल्या त्यावेळी हा हरी कोठे राहिला काय माहित ? माझ्यासमोर लाकडी खुंटा वेलींच्या जाळया आल्या त्यापुढे या कृष्णाने माझी चेष्टाच आरंभिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे गवळणी तू घाबरु नकोस मी तुझ्याबरोबर आहे आपण संतांनी सांगितलेल्या मार्गाने हरीजवळ जाऊ म्हणजे आपल्याला स्वर्ग व नरकाचे काटे पायात मोडणार नाहीत.
