देवाचे घरी देवे केले
1858.
देवाचे घरी देवे केले चोरी । देवे देव नागवूनि केला भिकारी ॥१॥
धावणिया धावा धावणिया धावा । मागचि नाही जावे कवणिया गावा ॥धृपद॥
सवेचि होता चोर घरिचिया घरी । अवघे केले वाटोळे फावलिया वरी ॥२॥
तुका म्हणे येथे कोणीच नाही । नागवले कोण गेले कोणाचे काई ॥३॥
अर्थ :
जीवरूपी देवाच्या घरी ईश्वररूपी देवाने काम - कर्म अविद्येची चोरी केली ; आणि अशा रीतीने देवानेच जीवरूपी देवाला लुटून त्याला भिकारी - असंग करून टाकले आहे. याकरिता धावणारे लोकहो, धावा धावा ; पण ज्याने आपल्या शोधाचे साधनच ठेवले नाही. ज्याने कार्य-कारणांचा अत्यंत भावरूप बाध केला आहे, त्या अव्यक्त, निराकार चोर देवाचा शोध करण्याकरिता कोण्या गावाला जावे ? ते मात्र कळत नाही हो ! तो चोर देव इतके दिवस अंतःकरणरूपी घरातच आमच्या बरोबरच राहात होता ; आणि चित्तशुध्दीची संधी सापडताच त्याने जीवाचे वाटोळे केले. देहादी उपाधींचा निरास केला. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा जीवरूपी देवाची ईश्वररूपी देवाने चोरी केली, त्या अवस्थेत जीवेश्वराचे परम ऐक्य झाल्यामुळे दोघापैकी भिन्न असा कोणीच राहिला नाही ; तर मग त्या अद्वैतस्थितीत कोणी कोणाला लुटले ; आणि कोणाचे काय गेले ?अर्थात सारेच मिथ्या आहे.
