उदकेवीण मासा जैसा तळ
58.
उदकेवीण मासा जैसा तळमळी ।
चातक भूतळी मेघ इच्छी ॥१॥
तैसे भक्तिलागी कळवली मन ।
भक्ति हे निर्वाण तेचि खरी ॥२॥
एकुलता पुत्र सापडे वैरिया ।
कुरंग हा ठाया पारधीचे ॥३॥
पतिव्रता पतिवियोगे तडफडी ।
भ्रमर प्राण सांडी पुष्पेविण ॥४॥
तृषाक्रांत जैसा इच्छित जीवना ।
चकोर हा जाण चंद्रामृता ॥५॥
बहेणि म्हणे तैसी आवडे हरिभक्ति ।
तेव्हा आंतरविरक्ति वोळखावी ॥६॥
