प्रेम ते पडिभरे देवा
1775.
प्रेम ते पडिभरे देवासी वोसंडे | क्षमा तयाकडे शोभतसे ॥१॥
प्रेमाचे स्फुंदन न सांवरे नामया | पसरोनिया बाह्या देत क्षेम ॥२॥
सावध रे नामया आलिंगिला नाही | आवडते कांही सांग मज ॥३॥
उघडोनिया नयन पाहे दृष्टिभरी | वैकुंठाभीतरी चला जाऊ ॥४॥
ऐकोनिया नामा जालासे सावध | मग देतसे शब्द नारायणा ॥५॥
भक्तिविण सुख नेघेचि वैकुंठ | पंढरी प्रगट परब्रह्म ॥६॥
हेंचि गोड आम्हा आवडे बा हरी | वैकुंठाभीतरी नाही चाड ॥७॥
सर्वकाळ सेवा करू मे कीर्तन | येणे माझे मन संतुष्ट सदा ॥८॥
संबोखिला नामा हृदयावरि हस्तक | येरू चरणी तू मस्तक ठेवी ॥९॥
भाग रे नामया आवडे जितुले | त्रिभुवना इतुले ब्रह्मसुख ॥१०॥
देईन मागसी ते ऋद्धिसिद्धी कामारी | परिपूर्ण घरी अखंडित ॥११॥
नामा म्हणे पंढरी कीर्तन करीन | परि न सोडी चरण तुझे ॥१२॥
