क्षुधेलिया अन्न । द्
2114.
क्षुधेलिया अन्न । द्यावे पात्र न विचारून ॥१॥
धर्म आहे वर्मा अंगी । कळले पाहिजे प्रसंगी ॥धृपद॥
द्रव्य आणि कन्या । येथे कुळ कर्म शोधण्या ॥२॥
तुका म्हणे पुण्य गाठी । तरिच उचिताची भेटी ॥३॥
अर्थ :
भुकेल्या माणसाला अन्न देताना त्याची पात्रता आहे की नाही हे ध्यानात घेऊ नये, त्याची क्षुधा भागून पोटाची आग शांत होईल व त्याचे चित्त समाधानी होईल हे पाहावे. परंतु द्रव्यदान आणि कन्यादान करताना जे समोर येईल त्याला सर्वकाही देणे हे बरोबर नाही, दिलेल्या द्रव्याचा तो गैरवापर करणार नाही किंवा तो त्याचा कसा वापर करेल आणि इतरांना कसा त्याचा फायदा होईल हे लक्षात घ्यावे तसेच कन्यादान करताना देखील वराची सर्व ती माहिती काढावी आणि तिला तो साजेसा आहे की नाही, तिची त्याला हरकत आहे की नाही ह्या सर्व गोष्टी अभ्यासूनच मग हे कार्य करावे. कोणत्या प्रसंगी कसे वागायचे हे खरे धर्म कळल्याचे वर्म आहे, सर्वठिकाणी एकच नियम जोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात की त्याप्रमाणेच ज्या व्यक्तीच्या गाठी पुण्य असते, संचित असते त्याचीच शेवटी स्वतःच्या हिताशी गाठ पडते, म्हणजेच मनुष्याच्या अंगी त्यासाठीची असलेली सर्व पात्रता असेल तर त्यावर देवाची कृपा होऊन त्याचा उद्धार होतो अन्यथा नाही.
