मूळची एक सांगतो खूण
2561.
मूळची एक सांगतो खूण । एक आधी मग दोन । तयापासाव चार तीन । व्यापिले पांचें परिपूर्णं ॥१॥
ते भरुनी असे उरले । सर्वा ठायी व्यापियलें । जळी स्थळीं सर्व भरले । शेंखीं पाहता नाही उरले ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान । हेचि जाणती प्रेमखुण । समाधी पावले समाधान । नाही उरले भिन्नाभिन्न ॥३॥
शरण एका जनार्दनी । खुण बाणलीं निजमनी । व्यापक दिसे तिही त्रिभुवनी । गेला देहभाव विसरुनी ॥४॥
