शिवशक्ति विवाह - अभं
3485.
शिवशक्ति विवाह - अभंग ३४८५
हेमवंताच्या पोटी एक जन्मली गोरटी । तये त्या धूर्जटी वरियलें ॥१॥
मंडपाच्या द्वारी आला जंव नोवरा । अवगुणाचा म्हातारा रुप नाही ॥२॥
नांवा येव्हडिया बाळा अति नोवरा । कुवारीच्या संसारा शून्य जाले ॥३॥
येणे जाणे ठेले भोगणें खुंटले । नारदाचेनी बोले ऐसी दशा ॥४॥
काय कुमारी तया दिधली हे बाळा । इचिया कपाळीं कवण जाणे ॥५॥
शकुनालागीं दासी उभ्या पूर्ण कळसासी । पांच मुखें वरासी तिन्ही डोळे ॥६॥
दारा वरु आला मुद पै वोवाळी । साजुकासी घाली माळ गळा ॥७॥
सासू म्हणे कवणीं दिधली दुर्बुध्दी । विकल्याचा नंदी गोमाशा लावी ॥८॥
लग्नघडी आली अंतरपाटू धरा । अतिशये नोवरा उंच देखा ॥९॥
डोळ्यासी पुरे ऐसा नव्हे नोवरा । अंतरपाटू पुढा काय धरु ॥१०॥
कन्यादान वरा गोत्र पै उच्चारा । वृध्द परंपरा आहे वेगी ॥११॥
बापु तो नाठवे माय ते मी नेणे । कूळ गोत्र लाहणें नाही आम्हा ॥१२॥
बहुला वधुवरें संभ्रम सोहळा । अक्षवाणें बाळा करु आल्या ॥१३॥
तंव कंठीचा वासुकी दीपा फ़णु करी । धुधु:कारें नारी पळालिया ॥१४॥
प्रात:काळ जालीया काढिला भस्मारा । विभूती शरीरां लावियेली ॥१५॥
अगे हा काळाचाही काळु नव्हे धारी जाणा । संसारी लाहाणा जांवई नव्हे ॥१६॥
लग्ना येरे दिसीं उटणे मांडलें । धवळ आरभिलें संभ्रमेशी ॥१७॥
धवळामाजीं गाणीं गाईलें रामानाम । ऐकोनिया प्रेम वरा आले ॥१८॥
रामनाम ध्वनी ऐकतांच कानी । स्वेदु कंपु नयनी अश्रु आले ॥१९॥
उन्मळिता दृष्टी बाष्पु दाटे कंठी । मूर्च्छा पूर्ण सृष्टी विकळ पडे ॥२०॥
वरा पायरवू रक्षा पै कपाळा । त्रितीय नेत्री ज्वाळा उठलिया ॥२१॥
नोवरा हा नव्हे संसारु विवसी । देहभावें कवणासी नेदी उरो ॥२२॥
वेगी वधुवरा चौक न्हाणें करा । उकलिती सुंदरा जटाभारु॥२३॥
वराचिया माथा सोज्वळ सुंदरी । येरी म्हणे नोवरी मी महेशाची ॥२४॥
गौरी ते अर्धांगी सवती बैसे माथा । ऐसी याची कांता उमा गेली ॥२५॥
हा अकुळी अती वृध्द का केला समंधु । जिवेसी विरोधु पडिला साचे ॥२६॥
जेथे वडिलाधारें नाही तेथे बोळवण काई । कुंवारी कवणे ठायी दिधली देखा ॥२७॥
जेथे संघात अभाव तेथे येव जावो । जिण्यामरणा ठावो नुरेची ईसी ॥२८॥
विवेकेंसी जेथे परतलिया श्रुति । गौरी त्याचे हाता लावियेली ॥२९॥
माया माहेर खुंटले संकल्पें तुटले । ममत्व विटलें आजिचेनी ॥३०॥
बहु काळा जुनाट त्यासी शेषपाटु । संसारा शेवटु जाला माये॥३१॥
एका जनार्दनी प्रकृति प्राणेश्वरें । मिरवती बोहरें एकपणें॥३२॥
