पुंडलीक भक्तराज । ते
2509.
पुंडलीक भक्तराज । तेणे साधियेले काज । वैकुंठीचे निज । परब्रम्ह आणिले ॥१॥
पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळा सांगती । येऊनिया प्रीति । उभे समचि राहिले ॥धृपद॥
एका आगळे अक्षर । वैकुंठचि दुसरे । म्हणविती येरे । परि ती ऐसी नव्हेती ॥२॥
पाप पंचक्रोशीमधी । येऊ न सकेचिना आधी । कैची तेथे विधि । निषेधाची वसति ॥३॥
पुराणे वदती ऐसे । चतुर्भुज ती मानसे । सुदर्शनावरी वसे । न बुडे हे कल्पाती ॥४॥
अनुपम्य इची थोरी । महाक्षेत्र महीवरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथींचे ॥५॥
अर्थ :
पुंडलिक हा भक्तांचा राजा असून त्यांने फार मोठे कार्य साध्य केले आहे. ते म्हणजे असे की वैकुंठात राहणारे परब्रम्ह पंढरीत त्याने आणले आहेत. पांडुरंग बाळमूर्तीत गायी गोपाळांबरोबर होता, तेच परब्रम्ह पुंडलिकाच्या प्रेमा करता आपले दोन्ही चरण विटेवर सारखे ठेवून उभे राहिले आहे. हे पंढरी क्षेत्र म्हणजे वैकुंठा पेक्षा एका अक्षराने अधिक असून भूवैकुंठच आहे. इतरही अनेक स्थाने आहेत की ज्यांना तीर्थक्षेत्र असे म्हटले जाते परंतु पंढरी सारखे तीर्थक्षेत्र दुसरे नाहीच. पंढरी क्षेत्राच्या पंचक्रोशीत देखील पाप कधीच येऊ शकत नाही. मग तेथे विधिनिषेधाची वस्ती कशी असेल? पुराण असे सांगते की पंढरीतील माणसे चतुर्भुज आहेत. पंढरी हे क्षेत्र भगवान विष्णूच्या सुदर्शनावर वसलेले क्षेत्र आहे त्यामुळे कल्पाच्या अंती देखील ते कधीच बुडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात ही पंढरी पृथ्वीवरील महाक्षेत्र आहे तिची थोरवी अनुपम्य आहे. मग तेथे जाणारी जे वारकरी आहेत ते धन्य धन्य आहेत.
