बाळ सगुण गुणाचे तान्
265.
बाळ सगुण गुणाचे तान्हे गे | बाळ दिसते गोजिरवाणे गे |काय सांगता गाऱ्हाणे गे | गोकुळीच्या नारी ॥१॥
श्रीरंग माझा वेडा गे | याला नाही दुसरा जोडा गे |तुम्ही याची संगत सोडा गे | गोकुळीच्या नारी ॥२॥
पाच वर्षांचे माझे बाळ गे | अंगणी माझ्या खेळे गे |का लटकाच घेता आळ गे | गोकुळीच्या नारी ॥३॥
सावळा गे चिमणा माझा गे | गवळणीत खेळे राजा गे |तुम्ही मोठ्या ढालगजा गे | गोकुळीच्या नारी ॥४॥
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे | आळ घेता या गोपाळा गे |तुम्ही ठाईच्या वोढाळा गे | गोकुळीच्या नारी ॥५॥
तुम्ही लपवुनी याची गोटी गे | लागता याच्या पाठी गे |ही एवढीच रीत खोटी गे | गोकुळीच्या नारी ॥६॥
तुम्ही लपवुनी याचा भवरा गे | आळ घेता शारंगधरा गे |तुम्ही बारा घरच्या बारा गे | गोकुळीच्या नारी ॥७॥
हा ब्रह्मविधीचा जनिता गे | तुम्ही याला धरू पाहता गे |हा कैसा येईल हाता गे | गोकुळीच्या नारी ॥८॥
नामा म्हणे यशोदेसी गे | हा तुझा हृषीकेशी गे |किती छळितो आम्हासी गे | गोकुळीच्या नारी ॥९॥
