तंव दिव्य रत्नमणि मस
967.
तंव दिव्य रत्नमणि मस्तकी किरीटी | मळवट लल्लाटी कस्तुरीचा ॥१॥
माथा मोरपिसावेठी कुंडले गोमटी | पाहात कृपादृष्टी निजभक्ता ॥२॥
तो पुंडलिकाचा ठेवा पूर्वपुण्यराशी | वैकुंठनिवासी देवरावो ॥३॥
वदन निर्मळ भाव सुस्मित वेल्हाळ | दर्शनी रत्नकीळ तेज फांके ॥४॥
त्या सुखाचे अधिकारी भक्त सप्रेमळ | हृदयी सर्वकाळ हरिचे ध्यान ॥५॥
कौस्तुभ वैजयंती पदक हृदयावरी | शोभत साजिरी तुळसीमाळा ॥६॥
श्रीवत्सलांछन प्रीतीचे भूषण | चर्चिला चंदन श्यामतनु ॥७॥
शंखचक्र करी ते कर कटावरी | पितांबरधारी जलदनील ॥८॥
समचरण स्वयंभ उभा विटेवरी | रुळती तोडरी दानव दैत्य ॥९॥
तेणे दिव्य तेजे ब्रह्मांड धवळले | प्रकाथे लोपले दिग्मंडळ ॥१०॥
सकळ संत द्विज देखती चतुर्भुज | शंख चक्रांबुज गदापाणि ॥११॥
कीटकपक्षी पशुपाषाण तरुवर | देखती द्विजवर विठ्ठलरूप ॥१२॥
परमानंद बोधे निवाले आनंदे | भेदाभेद द्वंद्वे विसरोनि गेली ॥१३॥
एकाविण दुजे तेथे न दिसे पै आन | नाही आठवण देहभावा ॥१४॥
सबाह्य कोंदळी अवघी बिठ्टठलमूर्ति | सुखाची विश्वांति योगियांच्या ॥१५॥
प्रेमे वोसंडत सकळ भक्तजन | देती आलिगन एकमेका ॥१६॥
हर्षे निर्भर चित्ती आनंदे गर्जती | पावले विश्रांति सकळ द्विज ॥१७॥
ऐसा ब्रह्मानंद सोहळा भोगवी सकळा | आपुल्या प्रेमळा निजदासा ॥१८॥
करोनि सावध वैकुंठीचा राणा | नामा घाली चरणावरी त्यांच्या ॥१९॥
