भेदवादी जन वदतसे भिन
14.
भेदवादी जन वदतसे भिन्न । नव्हे ते लक्षण भज-नाचे ॥१॥
विश्वी विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचे कौतुक कैसे सांगा ॥२॥
ब्रह्मी नाही ठाव एकपणाचाही । तेथे दुजे कांही समावते ॥३॥
आदि मध्ये अंती खेळूनिया खेळ । उरले ते निखळ अविनाश ॥४॥
हेमी जैसे केले तैसे होती नग । तरी ते अव्यंग सोनेपणी ॥५॥
केली जैसी भक्ति शैव का वैष्णव । पाहता तो देव नाही दुजा ॥६॥
शिवविष्णु दोघे एकचि अवतार । वेदांनी निर्धार हाचि केला ॥७॥
नामा ह्मणे येथे दुजा नको भाव । विष्णु तोचि शिव शिव विष्णु ॥८॥
15 .
कांचीपुरी राजा नामे सोमदत्ती । तयाचे संपत्ती पार नाही ॥१॥
पूर्वपुण्यबळे लाधले तयासी । देता उपमेसी उणा शक्र ॥२॥
पांचशते तया कामिनी सुंदरा । करिता नाही पुरा झाला काम ॥३॥
रिद्धि सिद्धि घरी कामारि हिंडती । धैर्य शौर्य कीर्ति ज्याची जगी ॥४॥
नामा म्हणे जेथे उणे कांही नाही । ऐसे असो-निही न सुटे भोग ॥५॥
