विश्वास धरूनि राहिलो
2966.
विश्वास धरूनि राहिलो निवांत । ठेवूनिया चित्त तुझे पायी ॥१॥
तरावे बुडावे तुझिया वचने । निर्धार हा मने केला माझा ॥धृपद॥
न कळे हे मज साच चाळविले । देसी ते उगले घेइन देवा ॥२॥
मागणे ते सरे ऐसे करी देवा । नाही तरी सेवा सांगा पुढे ॥३॥
करावे काही की पाहावे उगले । तुका म्हणे बोले पांडुरंगा ॥४॥
अर्थ :
हे देवा मी तुझ्या ठिकाणी विश्वास ठेवून आणि माझे चित्त तुझ्या पायाच्या ठिकाणी ठेवून निवांत झालो आहे. आता तुझे वचन ऐकायचे फक्त एवढेच करायचे मग मी तुझ्या वचनाच्या पुढे तरलो किंवा बुडलो काय त्याविषयी काहीही काळजीच करायची नाही असा निर्धार माझ्या मनाने केला आहे. तू मला खरे देतो आहेस की मला खोटे देवून फसवितो आहेस हे मला काही कळत नाही परंतू जे काही मला तू देशील तेच मी गुपचूप घेईन देवा. देवा माझे मागणेच बंद व्हावे असे तुम्ही काहीतरी करा नाहीतर तुमची पुढे कोणती सेवा करु ते तुम्ही मला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा यापुढे मी काही करु की केवळ साक्षीरुपाने पाहू यासंबंधी तुम्हीच मला सांगा पाडूरंगा.
