गाऊ नाचू विठो तुझा त
4090.
गाऊ नाचू विठो तुझा तुज करू अनुवाद । जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद ॥१॥
आनंद रे विठोबा झाला माझे मनी । देखिले लोचनी विटेसहित पाउले ॥धृपद॥
न करी तपसाधन मुक्तीचे सायास । हाचि जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥२॥
तुका म्हणे आम्हा प्रेमा उणे ते काई । पंढरीचा राणा साठविला हृदयी ॥३॥
अर्थ :
हे विठोबा आम्ही तुझे नाम गाऊ त्याच छंदात नाचू आणि त्याचाच अनुवाद करु कारण जिकडे पाहावे तिकडे सर्वत्रच गोविंदाच मला दिसत आहे. हे विठोबा मी माझ्या डोळयाने तुझे विटेसहीत पाऊले पाहिले आहे त्यामुळे माझ्या मनाला आनंद झाला आहे. देवा मी तुझे नाम चिंतन करण्यावाचून कोणतेही तपसाधना करणार नाही सायुज्य मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी ही सायास करणार नाही जन्मोजन्मी हाच गोड भक्तीचा रस मला मिळावा असे मला वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता आम्हाला तुमच्या भक्तिप्रेमाचे काय उणे आहे कारण आम्ही पंढरीचा राणा म्हणजे राजा ह्दयात साठविला आहे.
