किती सोसिती करंटी ।
2934.
किती सोसिती करंटी । नेणो संसाराची आटी । सर्वकाळ पोटी । चिंतेची हळहळ ॥१॥
रिकामिया तोंडे राम । काय उच्चारिता श्रम । उफराटा भ्रम । गोवा विषय माजिरा ॥धृपद॥
कळता न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरले त्याचे चाळे । अंगी वारे मायेचे ॥२॥
तुका म्हणे जन । ऐसे नावबुद्धीहीन । बहुरंगे भिन्न । एकी एक न मिळे ॥३॥
अर्थ :
ही करंटी माणसे संसाराचे दु:ख किती सोसत आहेत हे कळत नाही. यांच्या पोटामध्ये सदा सर्वकाळ चिंता आणि हळहळ एवढेच असते. रिकाम्या तोंडाने रामाच्या नामाचा उच्चार जर केला तर या लोकांना काही श्रम होणार आहे की काय ? परंतू ते उलट भ्रम आणि विषयभोग यामधे ते गुंतून पडतात व त्यांना ते उन्मत्त करतात या लोकांना सर्व काही कळते परंतू न कळल्याचे सोंग करतात जसे डोळे उघडे आहे पण झाकल्यासारखे ते करतात. कारण यांच्या अंगामध्ये मायेचे वारे भरले आहे व ते मायेचे वारेच यांच्याकडून अनेक प्रकारचे चाळेच करुन घेत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारच्या लोकांचे नांव बुध्दीहीनच असते. प्रत्येक अज्ञानी लोकांचा स्वभाव हा वेगवेगळा असतात हे बहुरंगी असतात त्यामुळे तर यांचा स्वभाव एकमेकांशी मिळत नाही.
