दोराच्या आधारे पर्वत
3031.
दोराच्या आधारे पर्वत चढला । पाउलासाठी केला अपघात ॥१॥
अष्टोत्तरशे व्याधि वैद्ये दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्णता ॥धृपद॥
नव मास माया वाहिले उदरी । ते माता चौबारी नग्न केली ॥२॥
गायत्रीचे क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडीतसे ॥३॥
तुका म्हणे गुरु निंदकाचे तोंड । पहाता नरककुंड पूर्वजांसी ॥४॥
अर्थ :
एक मूर्ख दोराच्या साहाय्याने पर्वत चढला आणि पर्वत चढल्यानंतर त्याने तो दोर कापून खाली उतरण्याची आपली सोय नाहीशी करुन स्वत:च्याच पावलाचा आघात केला. शरीरातील एकशे आठ व्याधी वैदयाच्या साहाय्याने दूर केल्या आणि शेवटी त्याच वैदयाला मारुन त्याच्या ऋणातून तो उत्तीर्ण झाला. ज्या मातेने बालकाला नऊ महिने आपल्या उदरात वाढविले त्याच मातेला त्या मुलाने कालांतराने चव्हाटयावर नग्न केले. एकाने तर गाईचे सर्व दूध काढून घेतले आणि तिला विनाकारण खुंटीला बांधून काहीही चारा न टाकता व्यर्थ त्रास दिला. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे जो आपल्या गुरुची निंदा करतो त्याचे तोंड जरी कोणी पाहिले तर त्याच्या पूर्वजांना नरककुंड भोगावा लागतो.
