प्रात:काळी राधा उठोन
86.
प्रात:काळी राधा उठोनिया जाण । नंदसदनावरून पाण्या जात ॥१॥
इकडे गोदोहन करीतसे हरी । पाहे उभी द्वारी राधिका ते ॥२॥
विसरे गोदोहन वृषभाखाली बैसत । कृष्णजीचे चित्त वेधियेले ॥३॥
भरणा रिचवोनी बाहेर आली माता । वृषभ दोहता हरि देखे ॥४॥
माता ह्मणे काय करीसी घननीळा । प्रत्युत्तर त्यावेळा हरि देत ॥५॥
दाराकडे पाहे राधेसी न्याहाळून । मातेसी वचन बोलतसे ॥६॥
भरणा भरला आता जांई तू घेऊन । माता क्रोधायमान झाली तेव्हा ॥७॥
कृष्णासी यशोदा ह्मणे खाली पाहे । वृषभ की गाय दोहतसे ॥८॥
कृष्ण खाली पाहे वृषभ देखिला । ह्मणे यशोदेला ऐक एक ॥९॥
देवाचा नवस चुकली बहुतेक । चौ थानांचे थान एक झाले ॥१०॥
वचन ऐकोनी हांसत यशोदा । द्वारी उभी राधा देखियेली ॥११॥
कांगे येथे उभी घेऊनि घागर । जातसे सत्वर राधा तेव्हा ॥१२॥
नामा म्हणे ऐसे झाले । मुख प्रक्षाळून हरि जेविले ॥१३॥
