सत्यभामाव्रत - अभंग
3409.
सत्यभामाव्रत - अभंग ३४०९
कृष्ण सर्वागी सुंदर । लावण्य गुण रत्नाकर । सत्यभामा म्हणे हा वर । जन्मोजन्मी पावावा ॥१॥
ऎसे विचारिता मनी । तंव पातले नारदमुनी । चरणा लागली धांवोनी । वरासनीं बैसविलें ॥२॥
ऎका विनोद कथा विचित्र । नारद सत्यभामेसी सांगत । दान दिधलिया कृष्णनाथ । सोडवूं आता ते नेणे ॥३॥
करुनि षोडशोपचारे पूजा । मग म्हणे जी योगिराजा । तुम्हांसारिखा न देख दुजा । परियेसी माझा निर्धारु ॥४॥
मज मनी ऎसा भावो । जन्मोंजन्मीं कृष्ण नाहो । पावावया सुगम उपावो । व्रतें तपें की दाने ॥५॥
ऎकोनि हांसे नारदमुनी । म्हणे हे नाही मिनली कृष्ण मिळणी । म्हणोनि जन्मजन्मांतर सोसणी । विषयबुध्दि करीतसे ॥६॥
पाहूनि अधिकाराचा भेदु । तैसाचि उपदेश करिती साधु । इचा झडे गर्व मदु । तैसा विनोद करु आजी ॥७॥
म्हणती दिधल्यावांचून नाही पावणें । ऎसी बोलती पुराणे । येविषयीं स्मृतिवचनें । पूर्वदत्तें पाविजे ॥८॥
जरी हा कृष्ण दानासी देसी । तरी जन्मोजन्मी पावसी । हे जरी मानेल मानसी । तरी कृष्ण दानासी तू देई ॥९॥
सत्यभामा म्हणे कृष्णासी । तुम्हासी देईन दानासी । हे जरी मानेल मानसी । तरी आज्ञा मज द्यावी ॥१०॥
ऎकोनि हासिन्नले देवो । म्हणे नारदे विंदान मांडिलें पहा हो । जाणोनि तियेचा अभिप्रावो । धन्य भावो प्रिये तुझा ॥११॥
म्हणे तुझी प्रिति मज बहु । तुज मनी जैसा जिऊ । तुज तैसा भाऊ । भीमकी पै नाही ॥१२॥
दाना न करी वो उशीरु । आजिचा पर्वकाळ थोरु । शुध्द सप्तमी रविवारु । मकरीं सूर्यो गुरुयुक्त ॥१३॥
सत्यभामा म्हणे ब्राम्हणासी । तुम्हांसी कृष्ण देईन दानासी । ते म्हणती गिळील अनुष्ठानासी । ध्येय ध्यानासी उच्छेदु ॥१४॥
जेणे हिरोनी परात्पर नोवरी । येणे घातली निजमंदिरीं । अह मामा जीवे मारी । अकर्मे करी हा कृष्ण ॥१५॥
आम्ही भिक्षुक ब्राम्हण । कृष्णासी पाहिजे मिष्टान्न । कैंचें पीतांबर परिधान । आम्ही तयासी पुरवावे ॥१६॥
तो सदाचा परदारीं । कर्मे तितुकीं अकर्मे करी । विटाळ न व्हावा य़ाचा घरी । आम्हा सोंवळें स्वयंपाका॥१७ ।
सत्यभामा म्हणे नारदासी । ब्राम्हण दान न घेती कृष्णासी । काय करु वो देवऋषी । तू दानासी अंगिकारीं ॥१८॥
म्हणवुनी धरिले दोनी चरण । कृष्णदासासी तू पात्र धन्य । आजीचें मानावे वचन । व्रत जेणे परिपूर्ण होय ॥१९॥
नारद म्हणे भले आता । व्रते तपेंविण कृष्णा ये हाता । कवण सरे मागुता । कर्मकरंटा कर्मिष्ठु ॥२०॥
सेवकापदीं स्वामी ठावो । सेवेचा सेवक होईल देवो । न कळे दोहींचा अभिप्रावो । येरी लवलाहो दानाचा ॥२१॥
सत्यभामेनें श्रीकृष्ण । आणिला सालंकृत श्रुंगारुन । आपुलेनि पल्लवें झांकून । नारदा करी देतसे ॥२२॥
येरी म्हणे प्रतिग्रहिताम । प्रतिगृण्हामि नारद म्हणता । नमामि म्हणोनि कृष्णनाथा । मग संकल्पें घातला॥२३॥
नारद म्हणे रे कृष्णा । बोध बांधुनी घेईं ब्रम्हाविणा । तुटों नेदी मुळींच्या खुणा । जिवींचा जिव्हाळा राखावा ॥२४॥
पैल माझिया सिध्द पादुका । सावधाने जवळी घे का । येरे वंदिलिया मस्तका । ब्राम्हणाच्या म्हणवुनी ॥२५॥
अरे हे देवपूजा घेऊनि खांदीं । माझी बांधोनियां त्रिशुध्दी । बोधें बांधिनियां बुध्दी । अलिप्तपणी वागवावी ॥२६॥
ओंवळेपणें नातळे क्षिती । विटाल न व्हावा महाभूतीं । पाउला पाउली आत्मस्थिती । देव निगुती आणावो ॥२७॥
पुढे चालिला नारद । मागे मागे गोविंद । येरु म्हणे का रे मंदमंद । गृहसंबंध न सुटे ॥२८॥
नेणसी वैराग्याची ओढी । सांडीं स्त्रीपुत्राची गोडी । देहगेहाची आवडी । ते खोडी मज नावडे ॥२९॥
नारद म्हणे रे कृष्णा । शौचविधिसी उदक आणा । मृतिका अवलोकुनी नयना । जीवेंविण आणावी ॥३०॥
येरु म्हणे न दिसे जीऊपद । अवघे भूमंडळीची शुध्द । कोपेंविण कोपला नारद । वेद विरोध बोलतसे॥३१॥
अरे हे ब्रह्मी ब्रह्माचर्याची कसोटी । जीवा जीवनें प्रक्षाळिलीं गोमटी । सोंवळें पाहोनिया दृष्टी । वरी वाळे घालावी॥३२॥
येरु म्हणे न दिसे वोवळे । अवघे त्रिभुवनचि सोंवळें । विकल्प कल्पना विटाळे । शुध्दासी मळ म्हणताती॥३३॥
कृष्णें केले नारदाचे चरणक्षालन । ते तीर्थ मुखी मस्तकी वंदून । ह्रदयी धरिले आलिंगून श्रीवत्सलांछनाहुनी आध॥३४॥
कृष्णे तीर्थाचे केले वंदन । कृक्ष्णतीर्थाचें जन्मस्थान । तोही करी ब्राम्हणपूजन । धरा अमर पूजी जे॥३५॥
कृष्ण चुरी नारदाचे चरण । म्हणे मी आजी धन्य धन्य । तुम्हांसी दिधले दान । परम पावन मी झालों॥३६॥
अलक्ष दोघांचे महिमान । कवण स्वामी सेवक कोण ब्रम्हांदिकां न कळे जाण । विस्मित जन द्वारकेचे॥३७॥
जन म्हणती हा नारद जाण । आम्हा देखता वंदी श्रीकृष्ण चरण । त्यास हाता आलिया कृष्ण । येणे माणुसपणा सांडियेलें॥३८॥
नीच सेवकाची गती । सेवा घेतो कृष्ण हाती । बाईलेच्या भिडा श्रीपती । नारदहातीं सांपडला॥३९॥
नारद कृष्णासी नेतां दुरी । सत्यभामा रुदन करी । अंतरले श्रीहरी । जन्मांतरीं कोण पावे॥४०॥
नारदे ठकिले ठकिले गे फ़ुडी । मजचि बुध्दि ठाकी कुडी । युगासमान जातसे घडी । अति चरफ़डी मीन जैसी॥४१॥
सत्यभामेच्या मंदिरी । मिळाल्या सोळा सहस्त्र नारी । भली प्रवर्तली सवती मत्सरी । आपणया आपण नाडियेलें॥४२॥
नाक कापुनी आपुलें । वैरियां अपशकुन केले । ते तुवा साच दाविले । दाना दिधले निजपती॥४३॥
मग बोलली नागर जयंती । तुवा आस्वली आणिली आम्हा भोंवती । अवघिया श्रेष्ठ जांबुवंती । जाली सवती तुझेनी॥४४॥
कृष्णाअंगीं लागली चोरी । सामास घातला विवरी । आस्वला वरपडा केला श्रीहरी । पूर्व वोळखी वांचला॥४५॥
तंव बोलली मित्रवृंदा । तुझी दुष्टबुध्दी गे सदा । भोगणें सांडूनियां परमानंदा । आजन्मांतर पर इच्छिसी॥४६॥
अहंभावें सोहं धरणी । तुवा भांडविला सारंगपाणी । कृष्ण पडिला विकल्पा बाणी । कुडी तू धरणी लोळसी॥४७॥
आम्ही सदाच्या समभाग । तेणे उमजला श्रीरंग । भेदुनी अहंभावाचे अंग । वरासनीं श्रीकृष्ण॥४८॥
तेणे परिणल्या अनंत शक्ती । सोळा सहस्त्र आणिल्या सवती । हे तंव तुझीच ख्याती । न लाजसी चित्ती निर्लज्जे॥४९॥
मग बोलिली लक्षुमणा । थोर भुलली गे देहाच्या बरवेपणा । केली जन्मांतर तृष्णा । ते तंव कृष्णासी नावडे॥५०॥
आजन्म न जन्मे श्रीहरी । कैंचा पावसी जन्मांतरी । नाडलीस दोहोंपरी । येथे न तेथेंसें जाले तुज॥५१॥
तंव बोलिली कालिंदी । तुझी दृष्टी गे देहबुध्दी । कृष्ण परमात्मा त्रिशुध्दी । मन बुध्दि नातळे॥५२॥
त्यासी तू गे निजकल्पना । आणू पहासी जन्मबंधना । तुझी तुज गे फ़ळली वासना । दुष्ट बुध्दी॥५३॥
हांसोनी बोलिली जांबुवंती । जैसी घटामाजी गभस्ती । असोनि अलिप्त चित्ती । तैसा श्रीपती विषयासी॥५४॥
भोग भोगुनी अभोक्ता । कर्म करुनी अकर्ता । त्यासी कैंची जन्मकथा । कृष्ण सर्वथा अजन्म॥५५॥
हा साक्षात्कार ब्रह्म जाण । चिन्मात्रैक चैतन्यघन । त्यासी तू माणूस म्हणसी कृष्ण । कुडी कल्पना हे तुझी॥५६॥
ज्यासी जैसी गे भावना । त्यासी फ़ळे वासना । तुझी तुज भोंवे कल्पना । निजबंधना भवमूळ॥५७॥
मग बोले सुभद्रा । तुवा कलंक लाविला कृष्णचंद्रा । तुझी बुडाली ज्ञानमुद्रा । जन्मसमुद्रा पडलीसी॥५८॥
कृष्ण सबाह्य परिपूर्ण । चिन्मात्रैक चैतन्यघन । तयासी कैसे जन्ममरण । जीवा जीवन श्रीकृष्ण॥५९॥
तेथे पावली देवकी । म्हणे ज्ञानमुढे सत्राजिताचे लेकी । म्या नवमास वाहिली की । तू दानासी स्वामिनी॥६०॥
तुझेनि बापें घातला आळ । विवरी सूदला माझा बाळ । रीसा वरपडा गोपाळ । निजभाग्यें वांचला॥६१॥
तुझेनि बापें तुज वर । केला सत्यभामा निर्धार । तू दाटुनी निघालीस घर । मणी आंदणा म्हणवुनी॥६२॥
त्या मणियाच्या लोभे जाणा । तुझा बाप मुकला प्राणा । तुवा मारिले सत्यभामा । आणि पळविला अक्रुर॥६३॥
जै आणविले हनुमंता । ते तुज म्हणीतले होये सीता । नानावेष आणितां । परि सर्वथा नव्हेसी॥६४॥
लाजा झालीस काळमुखी । तंव पाचारिली भीमकी । वचनमात्रें झाली जानकी । रामरुपीं आरुप॥६५॥
थितें अंतरले कृष्णसुख । सत्यभामा अधोमुख । मरमर करिती सकळही लोक । तेणे दु:ख दुणावें॥६६॥
जैसी का चोराची माये । धाय मोकलोनी रडो न लाहे । तैशीच दशा होत आहे । आंतचे आंत चरफ़डी॥६७॥
हे ऎकोनी कोपला । बळिभद्र जाणा । म्हणे वारु पालानारे पालाना । घाव घातला निशाणा । धांवे धांवण्या बंधूच्या॥६८॥
कृष्ण पदांकिता वाट । लागे मागे लगबग सुभट । अश्व राजांचे पै थाट । घडघडाट पै रथांचे॥६९॥
आम्ही म्हणो ब्रह्मनिष्ठा नारद । हा तंव विश्वासघातमी मैंद । आमुचा मुगुटमणि गोविंद । ठकवूनिया नेतसे॥७०॥
कृष्ण सांगे नारदापुढें । कोपे बलिदेव पातले गाढे । ज्येष्ठपणें दडती पुढे । म्या कवणीकडे पळावें॥७१॥
नारद म्हणे कृष्णासी । तू स्त्री ना पुरुष होसी । शेखी नपुंसक नव्हेसी । भवभयासी भिसी तूं॥७२॥
ऎसाचि तू सदा भ्याडू । जरासंध युध्दी काढिला मोडू । काळयवना भेणे आडू । मुदकुंदाचे रिघालासी॥७३॥
कृष्ण कांपतसे गदगदा । नारद हांसे खदखदां । सेवक बळेंविण गोविंदा । नामरुप तुज नाहीं॥७४॥
अवघी आपुलाची जाणसी । आपण आपणीया का भिसी । तू राहे माझे पाठीसी । मी कळिकाळासी पै जाणें॥७५॥
नारद म्हणे यादवांसी । अभिमान धरावा देवासी । ते आपण या दिधले दानासी । संबध तुम्हांसी पै नाहीं॥७६॥
देउनी मागुती घेसी दानाती । ते तंव होती रवरवासी । तेथोनी निर्गती नाही त्यासी । जेवी आचळ पा धर॥७७॥
कृष्ण मर दिधला दाना । हे काय समस्त नेणां । छळणोक्ति करता ब्राम्हणा । कुलक्षयो पावाल॥७८॥
जारे पुसा सत्यभामेसी । प्रत्यक्षासी साक्ष या कृष्णासी । ठकऊनि नेईल यादवांसी । तरी दंडासी पै लाभें॥७९॥
तेथे पातले वसुदेव उग्रसेन । समस्त यादव मिळोन । धरिले नारदाचे चरण । जीवदान द्यावे आम्हां॥८०॥
कृष्णाच्या पालटासी । जे मागाल ते देवऋषी । ते देउनी पदार्थासी । परी कृष्णासी सोडावे॥८१॥
नारद म्हणे मज म्हातारपण । म्हणऊन कृष्ण घेतला दान । एकलिया न करवे गमन । हा सांगाती जीवाचा॥८२॥
एक म्हणे ती देऊं साठा । नारद म्हणे तो काय करंटा । चालों नेणे आमुचिया वाटा । फ़ुकट पोटा कोण घाली॥८३॥
आमुच्या चालीं कृष्णासी चालणे । आमुच्या कर्मकर्तव्यपणें । आमुच्या गुणें होय सगुणें । धर्मसंरक्षण श्रीकृष्ण॥८४॥
पाहता श्रीकृष्णाचें मुख । फ़िकें होय समाधिसुख । स्वप्नीं न देखीजे दु:ख । हरीखें हरीखें कोंदाटे॥८५॥
ऎसी कृष्णाची आस केली मोठी । म्हणोनि जीवेंभावें घातली मिठी । तुम्ही आम्हा भोंवते शेवटी । दिधले दान मागतसां॥८६॥
जळो जळो हे आमुचे दु:ख । आशा सांडिली नि:शेष । तुम्हांसी तंव द्यावे दु:ख । अज्ञान मूर्ख म्हणाल॥८७॥
कृष्णाच्या पालटासी । कवण मागो पदार्थेंसी । जे जे उचित मानेल तुम्हांसी । शुध्द वस्तु मज द्यावी॥८८॥
श्रीकृष्ण पालट सीमंतमणी । नेघो म्हणती नारदमुनी । होईल सत्राजिताचे वानी । देहघातनीं पै लाभे॥८९॥
जितुके केले कृष्णाचें तुक । तितुके देऊनि कनक । नारद म्हणे आवश्यक । किती आग्रह करावा॥९०॥
तुला उभविली झडझडा । कृष्ण दिधला दाना । तरी मी सोडवीन जाणा । मज मर्यादा नाही धना । मणी आंदणा बापाचा॥९२॥
कृष्ण सोडवीन अभिमानेसी । म्हणवुनी घाली कनकरासी । कृष्ण न तुके अहंकारासी । लगड मासी तैसे सोनें॥९३॥
नि:शेष सोने सरलिया देखा । सत्यभामा अधोमुखा । तंव उठलिया यदुनायका । सोळा सळस्त्र सहमेळी॥९४॥
कृष्ण सोडवावा आपण । उपरा उपरी घालिती सुवर्ण । धनासमान नाही कृष्ण । नाही होणें कल्पांती॥९५॥
गजामुखीं जैसी राई । तैसे सोने झाले पाही । गोपिका म्हणती अगे आई । आता काई घालावें॥९६॥
विशेष द्रव्य वेंचिलियावरी । लाजलिया सोळासहस्त्र नारी । धनवंता नातुडे श्रीहरी । सखा हरी दीनाचा॥९७॥
घातले द्वारकेचे भांडार । कुमरा कुमरीचे अळंकार । सकळ सुनांचें श्रुंगार । तुला भार तरी नव्हेचि॥९८॥
नगर नागरिक लोक । देती आपुलाले कनक । द्वारका निर्धन केली देख । तुळा जोख तर्ही नव्हे॥९९॥
मोहे पातली देवकी । माझा बाळ मीच सोडवी निकी । म्हणवुनी वरुषली कनकी । वसुदेवा अच्युत॥१००॥
मोहे घातले कनक । मोहासमान नव्हे कृष्णतुक । मेरुपुढें जेवी मशक । तैसे कनक होउनी ठेले ॥१॥
रुपे तांबें पितळ । सिसे कांसे वाटोळ । धातु घातलिया सकळ । तुळा आढळ ते न ढळे ॥२॥
कृष्ण स्थूळ सूक्ष न अचाट । सर्व सर्वांगी निघोट । मेरुपरिस घनदाट । धराधरु बैसलासे ॥३॥
वस्त्रे भूषणे याची फ़ेडा । काही भार होईल थोडा । एक म्हणती कृष्णाचि कुडा । येणे वेडा लावियेले ॥४॥
भोळी सत्यभामा बापुडी । नारदे बुध्दि दिधली कुडी । कृष्ण अनुमोदनी फ़ुडी । आपणा दान देवविलें ॥५॥
एक ठक एक महाठक । ठकिले द्वारकेचे लोक । तरी न सुटे यदुनायक । तुळा तुक अपुरें ॥६॥
रत्नप्रवाळें मुक्ताफ़ळें । तुका घातले सकळे । नारदे केले वाटोळे । तरी गोपाळ न सुटे ॥७॥
नुचलें कृष्णाचें पारडे । धाये मोकलूनि देवकी रडे । वैरीण सत्यभामेनें केले कुडे । उपाव पुढे दिसेना ॥८॥
मागे देखिले ना ऎकिले । ते तुवा दान इया केले । भ्रतारासी दान दिधले । ना ऎकिले पुराणीं ॥९॥
देवकी धरी नारदाचे चरण । म्हणे मज दे गा पुत्रदान । नाही वालभरी सुवर्ण । तुझी आण वहातसें ११०॥
नारद म्हणे भीमकीपासीं । आहेत कनकाच्या राशी । वेगी बोलावा तियेसी । ते कृष्णासी सोडवील ॥११॥
सत्य जनीं जनार्दन । सकळासी मानले हे वचन । भीमकीचें शुध्द पुण्य । कृष्न सोडवण ते करील ॥१२॥
उध्दव पाठविला भीमकीपाशीं । साष्टांग नमन केले तियेसी । मग सांगे वृत्तांतासी । येरी मानसी हासिन्नली ॥१३॥
सपर्वत समूळ धरा । न पुरे कृष्णाचिया भारा । नारद लाघवी खरा । गर्व परिहारा यादवांच्या ॥१४॥
दोघांनाही दोन्हीपण । नारद तोचि नारायण । कवण जाणे हे विंदान । विचित्र खूण दोघांची ॥१५॥
मग जाऊनि वृंदावना । केली तुळसीस प्रदक्षिणा । पक्वदळ घेतले जाणा । अपक्व तुका पै न ये ॥१६॥
ते घालुनी कनक ताटीं । वरी झांकुनी क्षीरोदक दुटी । निजात्मभावे गोरटी । चरित्र दृष्टी पाहू आली ॥१७॥
केले नारदासी नमन । घेतलें चरणतीर्थ प्रार्थून । मग षोडशोपचारीं पूजा करोन । जवळी पै आली ॥१८॥
भिन्नभावें भजे देवासी । गंगा तळपे सागरी जैसी । निजभावें कृष्णचरणांसी । तुळा तुळसी ठेविले ॥१९॥
भावार्थाचे बळ गाढे । उचललें कृष्णाचे पारडे । सुवर्ण अधिक जाले पुढे । ते काढिती लवलाहे॥१२०॥
भीमकी भावार्थाची देख । तुळसीदळ एकले एक । देवासमान झाले तुक । पडिले ठक सुरनरा ॥२१॥
भावार्थ विकला देव । अर्थासी या नाही संदेह । जयासी जैसा भाव । तैसा देव तयासी ॥२२॥
केवळ तुळसी़च्या दळीं । सोडविला वनमाळी । धन्य धन्य भीमकबाळी । पिटली टाळी एकदांची॥२३॥
ऎका भावार्थाचा भावो । भावे सोडविला देवो । भावार्थीं संदेहो । अगम्य भावो भीमकीचा ॥२४॥
कृष्ण देव तै हे देवता । कृष्ण राम तै हे सीता । कृष्ण वसंत तै हे सुगंधता । सर्वांगी समरस ॥२५॥
कृष्ण मंत्र हे मातृका । कृष्ण देव हे वेदिका । कृष्णयज्ञ हे यज्ञसीखा । अनन्यपणें दोघे ॥२६॥
कृष्ण पुरुष हे प्रकृति । कृष्ण चैतन्य हे चितशक्ती । कृष्ण परमात्मा हे परमज्योती । अनन्य स्थिती दोघांची ॥२७॥
कृष्ण ज्ञेय तै ते ज्ञान । कृष्ण ध्येय तै ते ध्यान । कृष्ण साध्य तै हे साधन । अनन्यपणें पतिव्रता ॥२८॥
सुवर्ण अधिक जाले जोखुनी काढूनि टाकिलें धरणी । कर पदक कंकणीं । नाना अलंकार स्त्रियांचे ॥२९॥
तेथे मीनलिया नारी । जैशा आमिषालागी घारी । झोंबताती परस्परी । माझे तुझे म्हणउनी ॥३०॥
एकी म्हणती माझा चुडा । दुजी म्हणे ओळख फ़ुडा । तिजी म्हणे याचा जोडा । पाहे माझा मजपाशीं॥३१॥
एकी म्हणती गे फ़ळगट । तेझे कांखेचें माझे ताट । तिजी म्हणे संपुष्ट । माझे आंदण बापाचें॥३२॥
एकी म्हणे हे माझे कारलें । दुजी म्हणे ही खेंकीं सीजले । तिजी म्हणे डोळा दांतवण नाही केले । बुरसा स्वार्थ इचा घाण तो॥३३॥
येरी म्हणे गे मोठी चोखाट । सलोभ ईष्टा माखले ओठ । बोल घाणताही मठ । सांडी खटपट देई माझे॥३४॥
एकी म्हणती माझी जडीत जाळी राखडीसी । दुजी म्हणे डोळ्यांची आंबली पुसी ।
तिजी म्हणे नयनी विटाळसी जालासी । जालासी रजकीं न लाविसी विटाळ॥३५॥
येरी म्हणे कटाकटा मठ । म्हणो ये आंबट । किती करशील खटपट । माझा वांटा नीट देई॥३६॥
येरी म्हणे माझे पदक । दुजी म्हणे वोजी वोळख । तिजी म्हणे जीवा सुख । बोलोन का करिसी॥३७॥
अगे हे माझे हातसर । दुजी म्हणे परती सर । तिजी म्हणे मरमर । ते अलंकार पै माझे॥३८॥
एकी म्हणे ते हे माझेचि रुपे । कृष्ण घडिले हे सोपे । दुजी म्हणे माझेनि बापे । मज आंद्ण दिधलें॥३९॥
तुझे हातींची माझी झारी । तुझा गळाची माझी सरी । फ़ुकटा चावटा बेरी । तेल्या घरी घाण्याची॥१४०॥
सुनेस म्हणे देवकी । अगे अगे ओढाळाचे लेंकी । ते अलंकार माझे की । तू कैसेनी नेतेसी॥४१॥
येरी म्हणे मा मिसे । तुम्हांसी लागले धनपिसें । म्हतारपणें घेतलीत सोसे । माझे माझे म्हणतसां॥४२॥
यापरी जन विगुंतले सुवर्णा । रुक्मिणी घेउनी गेली कृष्णा । बाप धनलोभाची तृष्णा । निजपति कृष्णा विसरल्या॥४३॥
मोह रचिला विधातेनी । कनक आणि कामिनी । जी विन्मुख यापासुनी । तोचि जनी जनार्दन॥४४॥
नारदे नमस्कारिली ती भीमकी । म्हणे कृष्ण अनुभवीं तूंचि एकी । भली उतरलीस तुकीं । परम सुखी मी झालों॥४५॥
दोघा केली प्रदक्षिणा । नमस्कारुनी कृष्णचरणा । मग वाहुनी ब्रम्हवीणा । ऊर्ध्व पंथ चालविला॥४६॥
ऎसी कृष्णलीला विचित्र । महा पातकीयां करी पवित्र । जे आवडी गाती कृष्णचरित्र । धन्य धन्य जीवित्व तयांचें॥४७॥
एका जनार्दनी नमन । संकल्पेंसी केले दान । तेणे निरसिले मीतूंपण । कथाकीर्तन तो सेवी॥१४८॥
