लाजोनिया काळे राहिले
2720.
लाजोनिया काळे राहिले लिखित । नेदिता ही चित्त समाधान ॥१॥
कैसे सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥धृपद॥
एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मायेचा पदर कळो येतो ॥२॥
होत्या आपल्या त्या वेचूनिया शक्ती । पुढे झालो युक्तिकळाहीन ॥३॥
तुका म्हणे तुम्ही समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठे पावे ॥४॥
अर्थ :
देवा वेद शास्त्र पुराण यांनी तुझ्याविषयी जे गुण वर्णन गायिले आहे ते आता लज्जेने तोंड काळे करुन राहीले आहेत असे मला वाटते कारण मी तुला इतके आळविले तरी देखील तू माझ्या चित्ताचे समाधान केले नाही. अरे देवा जर तू आमच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलला नाहीस तर आम्हाला सुख तरी कसे वाटेल आणि प्रेम नसताना केवळ आपल्यामध्ये भेट झाली तर त्याचा काही उपयोग आहे काय ? एखादा मनुष्य दुस-या मनुष्याला भेटण्यासाठी गेला आणि त्याला प्रेमाने भेट देण्याऐवजी त्याला कोपरखळी मारुन हात आडवा केला तर त्या दोघामध्ये माया किती आहे हे लगेच कळून येते. देवा माझ्याकडे ज्या काही शक्ती व युक्ती होत्या त्या सर्व मी खर्च केल्या आहेत आता यापुढे माझ्याकडे कोणत्याही प्रकारच्या शक्ती व युक्ती शिल्लक राहिल्या नाहीत मी शक्ती व युक्तीहीन झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही सर्व समर्थ आहात त्यामुळे माझ्यासारख्या दुर्बलाची सेवा तुम्हाला कोठे पावेल ?
