हाके सरिसी उडी । घाल
413.
हाके सरिसी उडी । घालूनिया स्तंभ फोडी ॥१॥
ऐसी कृपावंत कोण । माझे विठाईवाचून ॥धृपद॥
करिता आठव । धावोनिया घाली कव ॥२॥
तुका म्हणे गीती गाता । नामे द्यावी सायुज्यता ॥३॥
अर्थ :
भक्त प्रल्हादाने आर्ततेने नारायणाला हाक मारताच नारायण स्तंभ फोडून स्तंभातून प्रकट झाले. अशी कृपावंत माऊली माझ्या विठाई माऊलीहून दुसरी कोण आहे ? तिचे स्मरण करताच प्रेमाने धावत येऊन ती भक्ताला मिठी मारते. तुकाराम महाराज म्हणतात हरीचेनाम गीतात आळवावे. त्याने सायुज्य मुक्ती मिळते.
