हे देखोनिया गोवळ ।
81.
हे देखोनिया गोवळ ।
आले धावोनिया सकळ ।
कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ ।
केले तुवा वृषभेंसी ॥१॥
आम्ही देखिले दुरोनी ।
होतो डोंगरी बसोनी ।
तो बैल आम्हालागुनी ।
कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥
येरु म्हणे तो असुर ।
तुम्हा भासला होता ढोर ।
कंसरायाचा तो हेर ।
जाता वधुनी सकळांते ॥३॥
ऐसा जाणोनिया निभ्रांता ।
शांति पावविला तो आता ।
तुम्ही भयाते न धरिता ।
सुखे विचारा मत्संगे ॥४॥
माझिया भजनी जे राहाती ।
त्यांचिया विघ्नाची शांती ।
करुनिया सुखविश्रांती ।
तया अर्पी सर्व सिध्दी ॥५॥
ऐसे ऐकोनिया हरिवचन ।
संतोषले सकळी जन ।
मग नमस्कारुनिया उभय चरण ।
गोकुळांप्रती चालिले ॥६॥
निळा म्हणे सांगती वडिला ।
वनी वर्तमान जो देखिला ।
धेनकासुर तो निपातिला ।
आजी कृष्णे युध्दसंधी ॥७॥
