वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › १५, मदालसा अभंग

उपदेश मदालसा देहो नि

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073083 · अभंग क्र. १०९

109.
उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा । आलासी कवण्या वाटा मातेचिया गर्भवासा ।
जो पंथ वोखटा रे पचलासी कर्मकोठा । अविचार बुद्धि तुझी पुत्र राया अदटा ॥१॥
पये दे मदालसा सोहं जो जो रे बाळा । निजध्यानी निज पा रे लक्ष लागो दे डोळा ।
निज ते तू विसरलासी होसी वरपडा काळा ॥२॥
नवमास कष्टलासी दहाव्याने प्रसुत झाली । येतांचि कर्मजात तुझी मान अडकली ।
आकांतु ते जननीये दु:ख धाय मोकली । स्मरे त्या हरिहरा ध्यायी कृष्ण माउली ॥३॥
उपजोनि दुर्लभु रे मायबापा झालासी । वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी ।
माझे माझे म्हणोनिया झणी वाया भुललासी । होणार जाणार रे जाण नको गुंफो भवपाशी ॥४॥
हा देहो नाशिवंत मळमुत्राचा बांधा । वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा ।
रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा । स्मरे त्या हरिहरा शरण जाई ऐसा ॥५॥
या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऐसा । माझे माझे म्हणोनिया बहु दु:खाचा वळसा ।
बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा । तृष्णा ते सांडुनिया योगी गेले वनवासा ॥६॥
या पोटाकारणे रे काय न करिजे एक । या लागी सोय धरी रे तिही भुलविले लोक ।
ठायींचे नेमियेले त्याचे आयुष्य भविष्य । लल्लाटी ब्रम्हारेखा नेणती ते ब्रम्हादिक ॥७॥
जळींची जळचरे रे जळीचिया रमती । भुलली ती बापुडी रे ते कांही नेणती ।
जंव नाही पुरली रे त्यांची आयुष्य प्राप्ती । वरि घालुनि भोंवरा जाळ बापा तयाते गिवसिती ॥८॥
पक्षिणी पक्षिया रे निरंजनी ये वनी । पिलिया कारणे रे गेली चराया दोन्ही ।
अवचिती सांपडली रे पारधिया लागुनी । गुंतुनिया मोहोपाशी प्राण त्याजिती दोन्ही ॥९॥
मृग हा चारिया रे अति माने सोकला । अविचार बुद्धि त्याची परतोनि मागुता आला ।
तंव त्या पारधियाने गुणी बाणु लाविला । आशा रे त्यजुनिया थिता प्राणा मुकला ॥१०॥
अठराभार वनस्पती फुली फळी वोळती । बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती ।
ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती । हे सुख सांडुनिया कासया योग सेविती ॥११॥
हे सुख सांडूनिया कोण फळ तयासी । कपाट लंघुनिया योगी ध्याती कवणासी ।
योग तो सांग मज कवण ध्यान मानसी । सर्वत्र गोविंदु रे हृ्दयी ध्यायी हृ्षीकेशी ॥१२॥
इतुकिया उपरी रे पुत्रा घेई उपदेशु । नको भुलो येणे भ्रमे जिवित्वाचा होईल नाशु ।
क्षीरा नीरा पारखी रे परमात्मा राजहंसु । निर्गूण निर्विकार पुत्रा सेवी ब्रम्हरसु ॥१३॥
इतुकिया उपरी रे पुत्र माते विनविता झाला । संसार सोहंळा थोर कष्टी जोडला ।
पंचभुते निवती येथे म्हणोनि विश्रामु केला । वोखटा गर्भवासु कणवा कार्या रचिला ॥१४॥
गर्भीची यातना रे पुत्रा ऐके आपुल्या कानी । येतो जाता येणे पंथे सांगाती नाही रे कोणी ।
अहंभावो प्रपंचु पुत्रा सांडी रे दोन्ही । चौर्‍यांशी जीवयोनी प्रवर्तले मुनिजन तत्क्षणी ॥१५॥
वाहाता महापुरी रे पुत्रा काढिले तुज । राक्षिलासी प्रसिद्ध सापडले ब्रम्हबीज ।
मग तुज ओळखी नाही का रे नेणसी निज । आपेंआप सदगुरु कृपा करील सहज ॥१६॥
उपजत रंगणा रे पुत्रा तुवा जावे वना । बैसोनि आसनी रे पाहे निर्वाणीच्या खुणा ।
प्राणासी भय नाही तापत्रयाचाराणा । मग तुज सौरसु पाहा रे परब्रम्हिच्या खुणा ॥१७॥
बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनी । चेतवी तु आपणापे चेतविते कुंडलिनी ।
चालता पश्र्चिम पंथे जाई चक्र भेदुनी । सतरावी जीवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१८॥
मग तू देखसी त्रिभुवन स्वर्ग मृत्यु पाताळ । नको भुलो येंणे भ्रमे सांडी विषय पाल्हाळ ।
आपणापे देखपा रे स्वरुप नाही वेगळे । परमात्मा व्यापकु रे पाहा परब्रम्हा सांवळे ॥१९॥
इतुकिया उपरी रे पुत्रा ते विनवी जननी । परियेसी माउलिये सन्तोषलो तत्क्षणी ।
इंद्रायणी महातटी विलासलो श्रीगुरुचरणी । बोलियेले ज्ञानदेवो सन्तोषलो वो मनी ॥२०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग