आलिया संसारा उठा वेग
3086.
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हे काळाचे धन कुबेराचे । तेथे मनुष्याचे काय आहे ॥धृपद॥
देता देवविता नेता नेवविता । येथे याची सत्ता काय आहे ॥२॥
निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥
अर्थ :
अहो लोकांनो या संसारात तुम्ही आलेच आहात तर मग उठा त्वरा करा आणि उदार पाडूरंगाला तुम्ही शरण जावे. अरे देह तर काळाच आहे आणि धन कुबेराचे आहे मग या मृत्यूलोकात मनुष्याचे काय आहे ? देता देवविता नेता नेवविता सर्व काही पाडूरंगच आहे मग येथे मनुष्याची कोठे सत्ता आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, मृत्यूलोकामध्ये प्राण्याला निमित्ताचा केवळ धनी केला आहे त्यामुळे त्याचाच व्यर्थ अभिमान प्राणी धरत बसला आणि त्याचा त्या कारणाने जन्म वायाला गेला.
