मनमोहना । कृष्णा कान
352.
मनमोहना । कृष्णा कान्हा ।
यादवकुळभूषणा । गोकुळमंडणा ।
देवकीनंदना । मुनिमानसमोहना ।
त्रिभुवनसदना । आनंदवदना ।
गोपीमनरंजना । संकटभंजना ।
अरिकुळदहना । गुणांच्या निधाना ॥१॥
कृष्णा नाच रे वेल्हाळा । म्हणती गोपी बाळा ।
थै थै ताल या । तोडिती ।
मिळोनिया सकळा । छंदे नाचती ।
वाजविती । घागरिया घुळघुळा ।
नवल करीते यशोदा । म्हणती भला भला॥धृ॥
हरि जगजीवना । करूणाधना ।
यमुनाजलखंडणा । गोवर्धना ।
गोकुळरक्षणा । दावानळप्राशना ।
गोपीप्रियकान्हा । मधुसूदना ।
पूर्णकामनिधना । अकळनिर्गुणा ।
चैतन्यघना । स्तविती गोपांगना ॥२॥
आनंदवना । पूतना-शोषणा ।
रिठासूरमर्दना । भवमोचना ।
गुणागुणविहीना । योगीजनपाळणा ।
धर्मरक्षणा । पापछेदना ।
भक्तजनउज्जीवना । मदनमाहना ।
त्रिपुटीभेदना । न करवे वर्णना ॥३॥
हरि गोविंदा । परमानंदा ।
नरनारीवेधका । नित्यानंद बाळमुकुंदा ।
मोक्षपददायका । सच्चिदानंदा ।
आनंदकंदा । वैकुंठनायका ।
हरिगुणभरिता । देवकीसुता ।
पांडवप्रतिपाळका ॥४॥
कृष्णरामा । मेघःश्यामा ।
पुरूषी पुरूषी पुरूषोत्तमा ।
आत्मारामा पूर्णकामा । योगीजनविश्रामा ।
व्यापकव्योमा । नकळे महिमा ।
वर्णिता तू ब्रह्मा । हरिनिजधामा ।
जय परब्रह्मा । काय वर्णू तुझा महिमा ॥५॥
ऐशा गौळणीबाळा । मिळुनी सकळा ।
खेळविती गोपाळा । भक्तिजिव्हाळा ।
दाविती कळा । नाचविती सावळा ।
थै थै ताला । हरिगुण बाळा ।
करिती स्तुति वेल्हाळा । तो सुख-सोहळा ।
पाहती डोळा । बहेणि त्या गोवळा ॥६॥
