प्रल्हाद चरित्र.
2173.
प्रल्हाद चरित्र.
दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगी तो विख्यात हिरण्यकश्यप ॥१॥
करुनिया तप तोषवी ब्रम्हाया । मागे वर तया दैत्यराव ॥२॥
वरदान मागे नसावा तो मृत्यु । कवणाचे हातु देव सुरा ॥३॥
गंधर्व मानव सकळांचे भय । नसावे तिळप्राय कवणेकाळी ॥४॥
दिवसा ना रात्री तिथी हो नक्षत्री । अंतरिक्ष क्षिती मरण नसो ॥५॥
घरी राजधानी चोहटा मंदिरी । कवणे ते स्थळी मृत्यू नसो ॥६॥
ऐसा वर मागे दिला ब्रम्हा देवे । तपाचे स्वभावे तयेकाळी ॥७॥
वर मागूनिया हरियले पद । देवांसहित इंद्र स्थान भ्रष्ट ॥८॥
तयेकाळी देव लपोनिया हरी । स्तविती अंतरी पाही पाही ॥९॥
देवराया आली कृपा ते समयी । म्हणे सर्व होई काळयोगे ॥१०॥
तयाचे उदरी भक्तराजराणा । प्रल्हाद सुजाणा होईल तो ॥११॥
तयासी छळिता पावेल शासन । हाचि भरवसेन नेम आहे ॥१२॥
नामा म्हणे देवे केले समाधान । आनंदे निमग्न आले स्थाना ॥१३॥
