राम कृष्ण ऐसी उच्चार
3151.
राम कृष्ण ऐसी उच्चारिता नामे । नाचेन मी प्रेमे संतांपुढे ॥१॥
काय घडेल ते घडो ये सेवटी । लाभ आणि तुटी देव जाणे ॥धृपद॥
चिंता मोह आशा ठेवीन निराळी । देईन हा बळी जीव पायी ॥२॥
तुका म्हणे काही उरो नेदी उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनि ॥३॥
अर्थ :
रामकृष्ण ही नामे मी माझ्या वाचेने उच्चारीन आणि संतापुढे प्रेमाने नाचेन. मग शेवटी काय घडेल ते घडो यापासून लाभ होईल की नुकसान होईल ते देवच जाणो. चिंता मोह आशा ही सर्व बाजूला ठेवून मी माझा जीव देवाच्या पायावर बळी देईन. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्याजवळ काहीही उरु देणार नाही काहीही राहू देणार नाही माझे मोठेपणा सर्व काही देवावरुन मी ओवाळून टाकीन.
