वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 34. संत नवनाथ - नवनारायण › 1. नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध › 1. पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे › 12. दिव्य अनुभव कधी व का ?

दिव्य अनुभव कधी व का

🙏 34. संत नवनाथ - नवनारायण · ABH-081055 · अभंग क्र. १२

12.
12. दिव्य अनुभव कधी व का ?
'श्रीगुरुचरित्र' किंवा 'श्रीनवनाथ भक्तिसार' अशासारख्या ग्रंथांची भक्तिभावाने पारायणे करणार्‍या साधकांना काही वेळा अनेक दिव्य अनुभव आल्याचे दाखले आहेत. यामध्ये नवनाथांचे किंवा एखाद्या नाथांचे दर्शन होणे, त्यांच्याकडून काही संदेश मिळणे किंवा पारायण काही विशिष्य हेतूने केलेले असेल तर त्या संदर्भात काही सूचना मिळणे, याचप्रमाणे वृत्ती पूर्ण आनंदमय होणे, सुवास येणे, स्वर्गीय नाद ऐकू येणे इथपासून 'आदेश' किंवा 'अलख्‌'यासारखे शब्द ऐकू येणे इ, अनेकानेक अनुभवांचा उल्लेख करावा लागेल. प्रस्तुत लेखकाला यापैकी बरेच अनुभव आलेले आहेत. तथापि, असे आध्यात्मिक अनुभव दुसर्‍याला सांगू नयेत असा दण्डक असल्याने त्याबद्दल जास्त काही लिहिता येत नाही. (फक्त असे अनुभव निश्चितपणे येतात व अनुभव येतात ही कपोलकल्पित कथा नव्हे, हे ठामपणे सांगण्यासाठीच अनुभव आल्याचे सांगितले आहे. )

अनुभव का येतात?
असो. आता हे अनुभव कुणाला येतील व ते का येतात त्याबद्दल माहिती पाहू.
हे अशाप्रकारचे दिव्य अनुभव अर्थातच पूर्वी सांगितल्याप्रमाणे शरीर व मनाची शुद्धी झाल्यावरच येतील यात शंका नाही. तोपर्यंतची पारायणे या गोष्टींच्या पूर्ततेसाठीच होतील. यासाठीच, पाठकांनी अनुभवांची घाई करू नये. फळ पक्क झाल्यावर झाडावरून आपोआप गळणारच आहे, अगदी त्याचप्रमाणे शरीर व मन एका विशिष्य पातळीपर्यंत शुद्ध झाल्यानंतर दिव्य अनुभव न मागताही आपोआप येणार आहेत!
अर्थात, त्यासाठी आणखीही काही नियम पाठकांनी पाळणे आवश्यक आहे.
पहिला महत्वाचा नियम म्हणजे वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हायला हवे. ही एकाग्रता इतकी असावी की, कथाप्रसंगाशी पूर्ण एकरूप झाल्यामुळे तो तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडतो आहे असे वाटले पाहिजे. दुसरा महत्वाचा नियम म्हणजे हे वाचन पूर्ण भक्तिभावाने व्हायला हवे. हे दोन नियम फार महत्वाचे आहेत. वरवर पाहता ते सोपे वाटले तरी ते अमलात येणे फार अवघड आहे!

पारायण्याचे दिव्य अनुभव
'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथाच्या पारायणाचे साधकांना अनेकदा दिव्य अनुभव येतात. ही पारायणे सकाम व निष्काम अशा दोन्ही पद्धतीने केली जातात. मात्र खर्‍या साधकाने ती निष्काम भावनेने करणेच अधिक योग्य ठरेल. ती तशी केल्यास अनेकदा स्वप्नात नाथांचे दर्शन घडते आणि मन आनंदी व शांत बनून साधक कृतकृत्य होतो!
प्रस्तुत लेखकाने अशा निष्काम भावनेने या ग्रथांची कितीतरी पारायणे आजवर केली असून थोडा आत्मस्तुतीचा दोष पत्करून एकच अनुभव सांगावासा वाटतो.
१९६९ साली सदर पोथीचे निष्काम भावनेने एक पारायण केल्यानंतर एक दिवस पहाटेच्या सुमारास प्रस्तुत लेखकाला स्वप्नामध्ये दोघा नाथांचे दर्शन घडले. त्यापैकी एक नाथ उंचीने कमी होते, तर दुसरे त्यांच्यापेक्षा बरेच उंच होते. हे बहुधा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथच असावेत. नंतर त्यापैकी जे उंच होते त्यांनी प्रस्तुत लेखकाला खाली बसविले व त्याच्या टाळूवर फुंकर मारली आणि दुसर्‍याच क्षणी दोघेही अदृश्य झाले. हा काही अनुग्रहाचाच प्रकार असावा असे प्रस्तुत लेखकाला वाटते व त्याबद्दल तो स्वतःला भाग्यवान समजतो. (विशेष म्हणजे या घटनेनंतर एका आठवड्यात पूज्य श्री गुळवणीमहाराजांकडून प्रस्तुत लेखकाला शक्तिपात दीक्षा प्राप्त झाली. )
असो, सकाम भावनेने या ग्रंथाची पारायणे केल्यासही असेच आश्चर्यकारक अनुभव येतात हे सुरवातीला सांगितलेच. विशेषतः या ग्रंथांतील २८ व्या अध्यायच्या नित्य पारायणामुळे अनेक अविवाहित तरुण-तरुणींचे विवाह जमल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे विवाह जमण्यात बरेच अडथळे येत होते. परंतु रोज न चुकता पूर्ण श्रद्धेने या अध्यायाचे एक पारायण सुरू केल्यानंतर एक महिना ते एक वर्ष या मुदतीत त्यांचे विवाह झाले!
'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथाच्या चाळीसाव्या अध्यायात त्यातील प्रत्येक आध्याय कोणत्या कार्यासाठी वाचावा याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये २८ व्या अध्यायाविषयी लिहिताना मालू कवी म्हणतात-
'अठ्ठाविसाव्या अध्यायात । पिंगले करिता स्मशानात ।
विरक्त होऊनि भर्तरीनाथ । पूर्ण तप आचरला ।
तो अध्याय करिता श्रवण पठण । त्या भाविकांचे होईल लग्न ।
कांता लाभेल गुणवान । सदा रत सेवेसी ॥'
अर्थात या अध्यायाच्या पठणामुळे मुलांना जशी गुणवान कांता मिळते त्याचप्रमाणे मुलींनाही गुणवान पती लाभतो यात मुळीच संशय नाही. प्रस्तुत लेखकाच्या संग्रही या उपासनेमुळे विवाह जमल्याची अनेक उदाहरणे आहेत.
अठ्ठाविसाव्या अध्यायाप्रमाणेच या ग्रंथांच्या ५ व्या अध्यायाचे घरात नित्य पठण केल्यास घरातील बाधा किंवा पिशाच्चपीडा दूर होते यात मुळीच संशय नाही. मध्यंतरी एके ठिकाणी असे वाचण्यात आले की ज्यांच्या पत्रिकेत कालसर्पयोग आहे अशांनीही हा अध्याय रोज वाचल्यास हा दोष कालांतराने दूर होतो. इतर अध्यायांच्या पठणाचेही ४० व्या अध्यायात सांगितलेल्या फलश्रुतीनुसार फारच आश्चर्यकारक अनुभव येताना दिसतात.
एक दिवस परगावच्या एका वकिलांचे प्रस्तुत लेखकास एक पत्र आले. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की, 'दोन वर्षांपूर्वी माझा व्यवसाय फार उत्तम प्रकारे चालला होता व महिन्याकाठी मला भरपूर पैसे मिळत होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून माझी नेहमीची गिर्‍हाईकेही माझ्याकडे न येता माझ्या समोरच्या वकिलांकडे जातात. हे असेच चालू राहिले तर लवकरच व्यवसाय बंद करून पोटासाठी कुठेतरी नोकरी पत्करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. तरी आपण यावर काही उपाय सुचवू शकाल का? '
त्या पत्रावर प्रस्तुत लेखकाने त्यांना असे कळविले की, 'तुम्ही फक्त श्रीनवनाथ भक्तीसार पोथीची सतत पारायणे आपल्या घरात चालू ठेवा. एक दिवस तुम्हाला याचा आपोआप उलगडा होईल व तुमचा त्रासही दूर होईल. '
त्यानुसार त्यांनी 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथाची पारायणे मोठ्या भक्तिभावाने सुरू केली.
असेच आठ महिने उलटले. परंतु त्यांचा प्रश्न अजून तसाच होता, त्यामुळे त्यांनी कंटाळून पारायणे बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यापूर्वी 'पारायणे बंद करू का? ' असे प्रस्तुत लेखकाला पत्र लिहून विचारले.
असेच आणखी चार महिने उलटले.
आणि एक दिवस एक चमत्कार घडला नि पारायणाचा अगदी जिवंत अनुभव त्यांना मिळाला!!
तो अनुभव असा-
दोन दिवसांपूर्वी त्यांची सावत्र आई त्यांच्याकडे राहावयास आली होती. त्या दिवशी रात्री आपले नित्याचे पारायण संपवून त्यांनी श्रीनवनाथांची आरती म्हणण्यास सुरुवात केली. आणि त्याच वेळी त्यांची आई एकाएकी घुमू लागली.
ते पाहून वकील महाशयांना थोडे आश्चर्य वाटले व त्यांनी थोडे धाडस करून, 'तू कोण आहे? ' असा वकिली थाटात तिला प्रश्न केला.
त्यावर ती म्हणाला, 'मी कोकणाई देवी आहे. '
'पण तू इथे कशाला आलीस? ' वकिलांचा प्रश्न
'तुझे वाटोळे करण्यासाठी.... '
'तुला इकडे कुणी पाठवले? '
'तुझ्या सावत्र आईनेच मला इथे पाठविले आहे. तुम्ही सर्वजण उपाशी मरावेत अशी माझी इच्छा आहे. '
'मग त्यासाठी तू काय करतेस? '
'तुझ्या दाराबाहेर उभे राहून तुझा धंदा बंद करते. '
'आता तू येथून केव्हा जाणार आहेस? '
'आता मला जावेच लागेल. '
'कारण? '
'कारण तू रोज इथे जे वाचन करतोस त्यामुळे इथे फार काळ राहणे मला शक्य होणार नाही. '
आणि त्याच वेळी आईच्या अंगातला संचार एकाएकी थांबला.
नंतर थोड्याच दिवसात त्या वकिलांचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत्‌ उत्तमप्रकारे सुरू झाला हे सांगणे नकोच!
सदर वकिलांनी ही सर्व हकीकत प्रस्तुत लेखकाला पत्रातून सविस्तर कळविली असून ती पत्रे प्रस्तुत लेखकाने मुद्दाम जपून ठेवली आहेत.
एका नाथपंथीयाचे मार्गदर्शन (दैनिक पारायण)
काही वर्षांपूर्वी प्रस्तुत लेखकाला योगायोगाने एक नाथपंथी गृहस्थ भेटले. त्यांनी बोलता बोलता या पोथीच्या पारायणाचे संदर्भात जे मार्गदर्शन केले तेही वाचकांना उपयुक्त ठरेल असे वाटल्याने ते येथे देत आहे.
ते म्हणाले-
'आपले जे अवघड काम नाथांकडून करून घ्यावयाचे असेल ते एका कागदावर लिहावे. सुरवातीला अर्थातच 'श्रीगणेशाय नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री दत्तात्रेयाय नमः व श्री नवनाथाय नमः' असे लिहिण्यास विसरू नये. त्यानंतर रोज एक अध्याय वाचण्याचे कबूल करून आपले काम किती मुदतीत पूर्ण व्हावे हेही खाली लिहावे व त्यांनतर खाली सही करून तारीख टाकावी. नंतर हा कागद एका पाकिटात बंद करून ते पाकीट पोथीच्या चाळिसाव्या अध्यायात ठेवून द्यावे व त्यानंतर पोथीतील एक अध्याय रोज न चुकता वाचावा. त्यात खंड पडू देऊ नये. असा क्रम ४ ते ६ महिने चालू ठेवल्यास स्वप्नातून काही संदेश मिळतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे.
नवनाथ आपल्या भक्तांची कामे आपल्या बावन्न वीरांमार्फत करीत असतात. मात्र त्यांच्या कामात कुणावरही अन्याय होत नाही.
उदाहरणार्थ, आमच्या ओळखीच्या एका घरमालकांना एक बिर्‍हाडकरू अतिशय छळत असे. सर्व उपया करून थकल्यावर त्या गृहस्थांनी 'श्रीनवनाथ भक्तिसार' ग्रंथाचे वाचन वरील पद्धतीने सुरू केले. आश्चर्य असे की सहाच महिन्यात त्या घरमालकांना दोन वीर त्या भाडेकरूच्या घरात घुसत असल्याचे स्वप्नात दृश्य दिसले. त्याचा अर्थ, तो बिर्‍हाडकरू लवकरच जागा खाली करून निघून जाणार असे ते स्वप्न ऐकल्यावर एका थोर नाथपंथी गृहस्थांनी त्या गृहस्थांना सांगितले. परंतु त्यांना ते खरे वाटले नाही. कारण थोड्याशा भाड्यात मिळालेली, तसेच शहराच्या मध्यभागात असलेली व चांगल्या वस्तीतील हवेशीर जागा कुणी आपणहून सोडून जाईल अशी केवळ कल्पना देखील करणे कठीण होते.
परंतु एखादे काम नाथांनी मनात आणल्यानंतर त्यात अवघडते काय? आश्चर्य असे की, लवकरच त्या बिर्‍हाडकरूला एक चांगला फ्लॅट मिळाला व तो एक दिवस ती जागासोडून खरोखरच निघून गेला!
या ठिकाणी नाथांनी कुणावरही अन्याय न करता दोघांचीही सोय केली. कारण त्यांना सर्व जीव सारखेच आहेत.
हे अनुभव भक्तांची श्रद्धा वाढावी व तो ईश्वरप्रवण व्हावा यासाठीच येत असतात. मात्र प्रत्येक वेळी लहानसहान गोष्टींसाठी नाथांना साकडे घालणे कधीच योग्य ठरणार नाही हेही वाचकांनी विसरू नये. यासाठीच नाथांची पूजा करताना त्यांना रोज आपली गार्‍हाणी न सांगता फक्त त्यांची कृपा मागावी. कारण त्यांची कृपा ज्याच्यावर होते त्यांची संकटे आपोआपच दूर होतात !
असो. या ग्रंथाची पारायणे केल्यास दिव्य अनुभव कसे येतात व बावन्न वीरांमार्फत नवनाथ आपली इच्छा कशी पूर्ण करतात याची थोडीफार कल्पना येण्यासाठी एवढे अनुभव पुरेसे आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग